Karad Nagarpalika Election Result : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळून भाजपचा धुव्वा उडवला आहे. या ठिकाणी शरद पवार गट आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकशाही आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी विजय मिळवत आपणच कराडचे किंग आहोत हे दाखवून दिलं आणि भाजपच्या विनायक पावसकर यांना आसमान दाखवलं.
तिरंगी लढतीत राजेंद्रसिंह यादव यांची बाजी (Karad Nagarpalika Election Result)
कराड नगरपरिषद निवडणुकीत यंदा तिरंगी लढत झाली होती. यावेळी काँग्रेसकडून झाकीर पठाण, भाजप कडून विनायक पावसकर आणि लोकशाही आघाडी करून राजेंद्र सिंह यादव उमेदवार म्हणून उभे होते. तिरंगी लढत असल्याने कराडमध्ये काटे की टक्कर होणार हा अंदाज आधीपासूनच बांधण्यात आला होता. भाजपचे नेते आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे करुन नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर यांच्या पाठीमागे ताकद लावली होती. कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाताच्या पंजावर उमेदवार उभे करुन नगराध्यक्षपदासाठी झाकीर पठाण यांना ताकद दिली होती. मात्र या दोघांच्या वादात राजेंद्रसिंह यादव यांनी लोकशाही आघाडीकडून नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला.
9 हजार 735 मतांनी विजय
अंतिम निकालावेळी भाजपच्या विनायक पावसकर यांना 14,361 मते मिळाली तर लोकशाही आघाडीच्या राजेंद्रसिंह यादव यांना तब्बल 24,096 मते पडल्याने अखेर राजेंद्रसिंह यादव यांनी 9 हजार 735 मतांनी दणदणीत विजय मिळवला. आणि आपणच कराडचे खरे वाघ आहोत हे विरोधकांना दाखवून दिले. खर तर दोन आठवडे अगोदर राजेंद्रसिंह यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची नगराध्यक्षपदाची नेमप्लेट तयार करुन ती काही काळ त्यांच्या कार्यालयात ठेवली होती. आज अखेर विजय जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.





