अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता; आमदार मोनिका राजळेंची जादू कायम

Written by:Rohit Shinde
Published:
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. 21 पैकी 14 जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. आमदार मोनिका राजळेंची जादू कायम असल्याची चर्चा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता; आमदार मोनिका राजळेंची जादू कायम

महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. या निकालामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने मोठी बाजी मारली आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार गटाचे अनेक ठिकाणी पाणीपत झाल्याचं बघायला मिळालं.  भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. पाठोपाठ राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठे यश मिळविले आहे. तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेवर देखील भाजपाचा झेंडा फडकला आहे.

पाथर्डी नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपाला मोठे यश मिळाले आहे. पाथर्डी नगरपरिषदेच्या एकूण 21 पैकी 14 जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. तर भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड यांचा देखील मोठा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडू बोरूडे यांचा पराभव केला. त्यामुळे जिल्ह्यात पाथर्डी नगरपरिषदेच्या निकालाची चर्चा सध्या रंगली आहे.

आमदार मोनिका राजळेंची जादू कायम

भाजपाच्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांचे या यशामध्ये मोठे योगदान आहे. कारण, पाथर्डी मतदारसंघात राजळे यांचा मोठा जनसंपर्क असून पाथर्डी शहरातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये एक सकारात्मक भावना दिसून येते. राजळे यांच्या काळातील विकासकामे लोकांना भावतात, त्यामुळे नगरपरिषदेत देखील लोकांनी भाजपाला साथ दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शेवगाव नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे.