लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात मोठी अपडेट; सामाजिक न्याय विभागाकडून निधी वळवला!

Written by:Rohit Shinde
Published:
ऑगस्ट महिन्याचा हफ्ता लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात टाकला जाणार आहे. त्यासाठी 344.30 कोटीचा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात मोठी अपडेट; सामाजिक न्याय विभागाकडून निधी वळवला!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. खरंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसे घडलेले नाही. त्यानंतर आता सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ऑगस्ट महिन्याचा हफ्ता लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात टाकला जाणार आहे. त्यासाठी 344.30 कोटीचा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तयारी

लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. त्याचदरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी देण्यासंदर्भातील शासन निर्णय काल 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे.  ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यासाठी मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

योजना सुरळीत सुरू राहणार -आदिती तटकरे

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर उजाडला तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. एकूणच लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत भाष्य केलं आहे. महिन्याच्या हप्त्याबाबत भाष्य करताना म्हटलं, “लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरीत होईल. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे. लाडकी बहीण योनजेचा जो काही लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राहणार आहे” त्यामुळे महिलांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

२,१०० रूपये महिलांना कधी मिळणार?

जो काही जाहिरनामा असतो तो पाच वर्षांसाठी असतो. आम्ही जाहिरनाम्यात 2100 रुपयांचं आश्वासन महायुतीने दिलं होतं आणि ते नक्कीच आम्ही पूर्ण करू. सध्या प्राधान्य हे योजनेचा लाभ नियमितपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आहे. ज्या वेळी योग्य वेळ असेल त्यावेळी नक्कीच 2100 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया देखील आदिती तटकरेंनी दिली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews