MLA Sandeep Joshi’s political retirement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, विधान परिषदचे आमदार संदीप जोशी यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावर एक पत्र जारी करून राजकारणातून निवृत्तीचा निर्णय त्यांनी जाहीर केला, यामुळं त्यांच्या समर्थांकासह अनेकांना धक्का बसलाय. विदर्भातल्या भाजपाच्या राजकारणात चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. नागपूर महापालिकेत विजय मिळाल्यानंतरही भाजपा कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
निवडणुकीतील पराभवामुळे नव्हे तर त्यांच्या लाडक्या नेत्यानं राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानं कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. नागपुरातील लक्ष्मीनगरच्या विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयात मोठी गर्दी जमा झाली आहे. आमदार संदीप जोशी यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात पोहचले. त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असं सांगताना यातील अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. नुकतीच नागपुरची महानगरपालिका निवडणूक आटोपली, त्यात भाजपाला बहुमत मिळालं. मात्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नवोदितांना तिकीट देतांना, भाजप निष्ठावंतांवर अन्याय झाला, असं संदीप जोशींसारख्या अनेकांना वाटतंय.
भाजपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी जाणवली, यातूनच अनेक समर्थकांना आपण न्याय देऊ शकलो नाही या भावनेतून संदीप जोशी यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा आहे. मात्र नाराजी कुठलीही नाही, मात्र आता मला थांबायचे आहे, एवढंच कारण संदीप जोशी यांनी दिलंय. बदललेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कदाचित हा पर्याय स्वीकारला असावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या संदीप जोशींचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे.
संदीप जोशी यांची राजकीय कारकीर्द-
संदीप जोशी सध्या विधान परिषदेचे भाजपचे आमदार
त्यांचे वडील दिवाकर जोशी हे 1986 मध्ये विधान परिषद सदस्य
2002 ते 2022 कालावधीत संदीप जोशी नागपूर महापालिकेत नगरसेवक
2010 ते 2012 या काळात मनपा स्थायी समिती अध्यक्ष
2019 ते 2021 या काळात नागपूरचे महापौर
कोरोना काळात महिलांसाठी ‘सोबत पालकत्व प्रकल्प’ सुरू केला
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘दीनदयाळ थाळी’ उपक्रम
गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर निर्माण केलं
समर्थकांना आपण न्याय देऊ शकलो नाही या भावनेतून निवृत्ती…
संदीप जोशी यांचं विधान परिषद सदस्यत्व 13 मे रोजी समाप्त होणार आहे. मात्र त्यापूर्वीच संदीप जोशी यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर मतदारसंघातून संदीप जोशी उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र त्यावेळी पक्षानं उमेदवारी नाकारली होती. यंदाच्या मनपा निवडणुकीत जोशी यांच्या उमेदवारांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. संदीप जोशी यांनी घेतलेला हा निर्णय भाजपाला चिंतन करायला लावणारा आहे. जोशी यांच्यापूर्वी विदर्भातील दोन मोठ्या नेत्यांनी भाजपत सुरु असलेल्या इनकमिंगवर यापूर्वीही जाहीर भाष्य करत नाराजी व्यक्त केलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षाचे निष्ठावंत अशी ओळख असलेले सुधीर मुनगंटीवारही या मुद्द्यावर नाराज आहेत.
विदर्भातील जुन्या जाणत्या भाजप नेत्यांच्या या पवित्र्यामुळे भाजप विदर्भात ब्लॉक निर्माण झाला आहे का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. राज्यातल्या सगळ्या निवडणुकांत भाजपला दमदार यश मिळत असलं, तरी निष्ठावंतांना दूर करुन, इतर पक्षातील नेत्यांना नवोदितांना संधी देत पक्षाचा पाया मोडला जातोय का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. संदीप जोशींच्या राजकीय निवृत्तीचा निर्णय कदाचित मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं मागे होईलही, मात्र भाजपमध्ये असलेल्या अस्वस्थतेला यानिमित्तानं तोंड फुटलंय. राजकीय जीवनातून निवृत्तीचा संदीप जोशी यांचा हा निर्णय हा वैयक्तिक आहे की राजकीय नाराजी हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल.





