मुंबईत फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानके, बाजारपेठा आणि रस्त्यांवर फेरीवाले मोठ्या प्रमाणात जागा व्यापतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही, वाहतूक कोंडी वाढते आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत बेकायदेशीर फेरीवाल्यांवर बीएमसीकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई

कुलाबा कॉजवेवर बीएमसीची कारवाई, ६७ बेकायदेशीर फेरीवाले हटवले. पदपथ आणि रस्त्यांवरील वाढती गर्दी आणि वाहतुकीच्या समस्येला प्रतिसाद म्हणून ही मोहीम सुरू झाली आणि ती सुरूच राहील. अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात बीएमसीने ६७ बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई केली. या भागातील पदपथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे.

गेल्या चार महिन्यांत बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध ही दुसरी कारवाई आहे. जुलैमध्ये, बीएमसीने सार्वजनिक जागांवर अतिक्रमण केलेल्या ६० बेकायदेशीर फेरीवाल्यांना देखील हटवले. त्यामुळे प्रवाशांची सोय विचारत घेत आणि नियमभंग करणारे असा विचार करतच बीएमसीने कायदेशीर मार्गाने ही कारवाई केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर BMCची कारवाई

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याच्या मते, “ही कारवाई बेकायदेशीर फेरीवाल्यांपासून सार्वजनिक जागा मोकळी करण्यासाठी आणि कुलाबा रस्त्यावर गर्दी कमी करण्यासाठी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी कॉजवेवर स्टॉल लावणाऱ्या बेकायदेशीर विक्रेत्यांची ओळख पटवली. बुधवारी सकाळी हे स्टॉल हटवण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.”

अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या आठवड्यात ही मोहीम सुरू राहील. त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाहतूक विभागाकडून आल्या आहे. यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. बेस्टच्या बसेस या रस्त्यांवर धावत असल्याने, फुटपाथ आणि रस्त्यांवर गर्दी कमी करण्यासाठी फेरीवाले हटवणे आवश्यक होते.