नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करत भरघोस आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. यंदा महाराष्ट्रासाठी तब्बल 23,926 कोटी रुपयांचं रेल्वे बजेट मंजूर करण्यात आलं असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद मानली जात आहे. या निधीतून हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, मालवाहतूक कनेक्टिव्हिटी, बुलेट ट्रेन प्रकल्प, रेल्वे स्थानकांचा सर्वांगीण विकास अशा महत्त्वाकांक्षी योजनांना गती दिली जाणार आहे.
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गती
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं की, “महाराष्ट्रात सध्या एकूण 1.70 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद दरम्यानचे नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, मालवाहतूक कॉरिडॉर तसेच इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.” या प्रकल्पांमुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर राज्याच्या आर्थिक विकासाला देखील नवी दिशा मिळणार आहे.
मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वे
मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. या कॉरिडॉरमुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ केवळ 48 मिनिटांवर येणार असून, दोन्ही शहरे प्रत्यक्षात एकाच आर्थिक पट्ट्यात जोडली जाणार आहेत. यामुळे नोकरीसाठी रोजचा प्रवास शक्य होईल. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी वाढतील. उद्योग, सेवा क्षेत्र आणि रिअल इस्टेटला मोठी चालना मिळेल
पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन
पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले, “पुणे आणि हैदराबाद ही दोन्ही शहरे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन क्षेत्राची प्रमुख केंद्रे आहेत. या शहरांना बुलेट ट्रेन नेटवर्कने जोडल्यास प्रवाशांना आणि उद्योगांना मोठा फायदा होईल.” या कॉरिडॉरमुळे: प्रवासाचा वेळ फक्त 1 तास 55 मिनिटे…. मुंबई-लोणावळा-पुणे-दौंड मार्गे सिकंदराबादपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी होऊन दक्षिण आणि पश्चिम भारतातील आर्थिक दुवे अधिक मजबूत होतील.





