हाय स्पीड रेल्वे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आर्थिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये, बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस, जलमार्ग, कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग व विशेष रस्त्याद्वारे विमानतळही जोडण्यात येणार आहे. ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे.
बुलेट ट्रेनच्या स्थानकामुळे ठाण्याचे रूप बदलणार!
मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये एकूण १२ स्टेशन आहेत. त्यापैकी ४ स्टेशने ( मुंबई, ठाणे, विरार, बोईसर) महाराष्ट्रातील आहेत. या स्टेशन परिसरांचा नियोजनपूर्वक विकास करणे प्रस्तावित आहे. यासाठी भारत सरकार, जपान सरकार व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. यापैकी, ठाणे व विरार स्टेशन परिसराचा नियोजनबद्ध विकास आराखडा स्थानिक महापालिका, जपान सरकारचे प्रतिनिधी जायका व नगरविकास विभाग संयुक्तपणे करत आहे. या प्रकियेत नियोजनामध्ये सर्व भागधारक घटकांचा समावेश करून त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
हे ही वाचा
हाय स्पीड रेल्वे स्टेशन परिसराचा नियोजनबद्ध विकास झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. या मार्गावरील ठाण्यातील स्टेशन परिसर विकास करताना २५ टक्क्याहून अधिक जागेवर हरित क्षेत्र राखले जाणार आहे. ठाणे हाय स्पीड स्टेशन भारतातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन असेल. त्यात, बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस स्टेशन, जेट्टी ( जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग व विशेष रस्ते यांच्याद्वारे विमानतळ जोडण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सार्वजनिक वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध होतील. या सर्व सुविधा अत्यंत नियोजनबद्ध एकमेकांना पूरक पध्दतीने जोडण्यात येतील.
बुलेट ट्रेनमुळे विकासाला चालना मिळणार!
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशाच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या हाय-स्पीड रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि मुंबई- अहमदाबाद या दोन व्यापारी केंद्रांमध्ये सुलभ संपर्क प्रस्थापित होईल. यामुळे औद्योगिक क्षेत्राला नवी गती मिळेल, पर्यटन वाढेल तसेच रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारणीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे भारतात उच्च दर्जाची रेल्वे सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे.