रागासा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो व ऑरेंज सतर्कतेचा अलर्ट दिला आहे. बीड, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकरी व नागरिकांमध्ये वाढती काळजी पाहता प्रशासनानेही कंबर कसली आहे.
पावसाचे संकट पुन्हा गडद
26, 27, 28 आणि 29 सप्टेंबर पावसाच्या दृष्टीने महत्वाचे दिवस आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भावर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचे सावट आले आहे. ‘रागासा’ नावाचे चक्रीवादळ वेगाने विदर्भाच्या दिशेने सरकत असून, प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रागासा चक्रीवादळाचा धोका
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र बनला असून तो ‘रागासा’ चक्रीवादळाच्या स्वरूपात विदर्भाकडे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हेच रागासा चक्रीवादळ पुढे मराठवाड्याच्या दिशेने सरकरणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, जालना, धाराशिव, सोलापूर, अहिल्यागनर आणि संभाजीगर, पुणे या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, तसेच नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्यावी. संभाव्य पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोकण, मुंबईत काय स्थिती?
येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतातून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी काही राज्यांतून माघार घेतली आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्लीसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. मात्र, महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरातील बदलांमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.






