सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचा ‘वर्क टू रूल’चा इशारा, आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने संताप

Written by:Rohit Shinde
Published:
लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत ड्युटी असेल तेवढेच काम करण्याचा इशारा दिला आहे.
सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचा ‘वर्क टू रूल’चा इशारा, आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने संताप

मुंबईतील लोकलसेवा पुन्हा एकदा विस्कळीत होते की काय, अशी भीती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. कारण, लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत ड्युटी असेल तेवढेच काम करण्याचा इशारा दिला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर मुंब्रा अपघात प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता असल्याने कामगार आक्रमक होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत कर्मचाऱ्यांना आंदोलन केले होते, दरम्यान त्यावेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने काही प्रवाशांनी जीव गमावला होता.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

मुंब्रा येथे 9 जून रोजी झालेल्या अपघाताची रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तब्बल पाच महिन्यांनी 1 नोव्हेंबर रोजी दाखल झाला. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी व्हीजेटीआयच्या रिपोर्टच्या आधारे मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला. ट्रॅक जवळ येणे, खडी निसटणे, ट्रॅकवरील वेल्डिंग 5 जूनला न होणे आदी तांत्रिक मुद्द्यांवर व्हीजेटीआयने अहवालातून ठपका ठेवला होता. रेल्वे पोलिसांनीही आरोपींकडे चौकशीसाठी त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यावर रेल्वे अभियंत्यांनी अटी, शर्तीवर जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. 4 नोव्हेंबर रोजी या अभियंत्यांनी केलेल्या जामीन अर्जावर 11 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. मात्र सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला.

सरीकडे या दोन अभियंत्यांच्या बचावासाठी रेल्वेच्या कर्मचारी संघटनांनी 6 नोव्हेंबर रोजी मोटरमन केबिनबाहेर आंदोलन केले. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आणि त्याच दिवशी सायंकाळी रेल्वे रुळावरून चालणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देखील आता रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वे कर्मचारी संघटनांवर गुन्हा दाखल केल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी एस. के. दुबे आणि विवेक सिसोदिया यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कर्मचारी संघटना नाराज झाल्या आहेत.

पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा 

खरंतर रेल्वेच्या कर्मचारी संघटनांनी 6 नोव्हेंबर रोजी मोटरमन केबिनबाहेर आंदोलन केले. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आणि त्याच दिवशी सायंकाळी रेल्वे रुळावरून चालणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देखील आता रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वे कर्मचारी संघटनांवर गुन्हा दाखल केल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे गुन्हे दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा रेल्वे मजदूर युनियनच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. परिणामी पुन्हा एकदा संपूर्ण स्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत सरकार सुरूवातीलाच काही पाऊले उचलते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.