आज शुक्रवार, 01 ऑगस्ट, 2025 आजपासून सुरू झालेला ऑगस्ट महिना तुमच्या दैनंदिन आयुष्यात अनेक बदल घेऊन येत आहे. एलपीजी गॅस, ऑनलाईन बँकीग आणि निगडीत असे हे बदल असणार आहेत. ऑगस्टपासून देशाच्या आर्थिक क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर, प्रवासावर आणि कार्ड फायद्यांवर थेट परिणाम करतील. नेमके काय बदल होणार, ते सविस्तर जाणून घेऊ…
LPG गॅसच्या दरामध्ये घट होणार!
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य अन् व्यावसायिकांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे. आजपासून देशात कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलो वजनाच्या व्यवसायिक गॅसची किंमत आजपासून 33.50 रूपयांनी कमी करण्यात आली. खर्या अर्थाने या बदलामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे,
UPI मधील बदल
ऑनलाईन बँकींग, युपीआय आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहेत, अशी परिस्थितीत आता त्यामध्ये मोठे बदल होत आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. आता UPI शी संबंधित बँका आणि अॅप्सना बॅलन्स चेक सारख्या विनंत्यांची संख्या मर्यादित करावी लागेल. तसेच, ऑटोपे मॅन्डेट आणि अॅड्रेस व्हेरिफिकेशन सारख्या काही API चा वापर देखील नियंत्रित केला जाईल.
एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये बदल
11 ऑगस्ट 2025 पासून, एसबीआय कार्ड अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर दिली जाणारी मोफत हवाई अपघात विमा सुविधा बंद करणार आहे. याचा परिणाम एलीट आणि प्राइम सारख्या प्रीमियम कार्ड आणि काही प्लॅटिनम कार्ड धारकांवर होईल. आता या कार्डांना 1 कोटी किंवा 50 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा सुविधा मिळणार नाही, जो पूर्वी अतिरिक्त लाभ म्हणून उपलब्ध होता.
फास्टॅग वार्षिक पास
नवीन FASTag वार्षिक पास 15 ऑगस्ट 2025 पासून खाजगी वाहन मालकांसाठी उपलब्ध असेल. हा पास 3,000 रुपयांना उपलब्ध असेल आणि एक वर्ष किंवा 200 टोल व्यवहारांसाठी (जे आधी पूर्ण होईल) वैध असेल. वारंवार महामार्गावर येणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. हा वार्षिक पास घेणे अनिवार्य नाही, ज्यांना इच्छा आहे ते सध्याच्या पद्धतीने FASTag वापरू शकतात.
त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या या बदलांचा स्वीकार करून नागरिकांना आपले जीवनमान सुरू ठेवावे लागणार आहे. आर्थिक आणि बँकींग क्षेत्रात होणारे बदल लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव टाकत असतात, त्यामुळे हे बदल जाणून घेणे आणि त्या दृष्टीने तयारी ठेवणे अत्यंत जरूरीचे ठरते.





