छत्रपती संभाजीनगरातील औद्योगिक वाढ आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारा रिंग रोड प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या तीन प्रमुख औद्योगिक पट्ट्यांना जोडणाऱ्या या 67 किमी लांबीच्या रिंग रोडसाठी शासनाने सर्वेक्षण आणि भूसंपादन प्रक्रियेची मंजुरी देत प्रकल्प मार्गी लावला आहे. सहा पदरी ग्रीनफील्ड पद्धतीने तयार होणारा हा महामार्ग भविष्यातील औद्योगिक विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
आद्योगिक विकासाला बळ मिळणार
छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. ऑरिक सिटीअंतर्गत शेंद्रा आणि बिडकीन, तसेच एमआयडीसीअंतर्गत वाळूज, चिकलठाणा परिसरात अनेक उद्योगांनी आपले प्रकल्प उभे केले किंवा उभारणीची घोषणा केली आहे. बिडकीन औद्योगिक भागात सरकारने सुमारे आठ हजार एकर जमीन संपादित केली असून एथर एनर्जी, टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी आणि लुब्रीझोलसारख्या नामांकित कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीची रक्कम सुमारे 1261 कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी अपेक्षा असून त्यामुळे या भागात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत.
या सर्व औद्योगिक पट्ट्यांना जलद, सुरक्षित आणि थेट मार्गाने जोडणाऱ्या रिंग रोडची मागणी अनेक वर्षांपासून होती. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची गर्दी आणि रस्त्यांची मर्यादित क्षमता यामुळे उद्योग उत्पादनाच्या वाहतुकीत विलंब होत होता. प्रस्तावित रिंग रोड हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा मार्ग करमाड-एकोडपासून सुरू होऊन पाचोडमार्गे ढोरेगावपर्यंत जाणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यावर अवजड वाहतूक थेट शहराच्या बाहेरून वळवता येणार असून शहरातील दैनंदिन वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होणार आहे.
सध्या शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या औद्योगिक पट्ट्यांमधील प्रवासाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. नवीन सहा पदरी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 60 मिनिटांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. यामुळे केवळ वाहतूक सुलभ होणार नाही तर उद्योगांसाठी दळणवळण वेगवान होऊन उत्पादन आणि पुरवठा यांची गतीही वाढणार आहे.
भूसंपादनाला मंजुरी
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली 60 मीटर रुंदीची जमीन ग्रीनफील्ड पद्धतीने संपादित करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. शासनाने या प्रस्तावावर तातडीने सहमती दर्शवून सर्वेक्षण आणि भूसंपादनास मंजुरी दिली आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त करावयाच्या कंपनीच्या निविदा प्रक्रियेसाठीची फाइल मंजुरीसाठी दाखल करण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांनी दिली.
भूसंपादनासाठी शासनाने दोन टप्प्यांमध्ये निधी मंजूर केला आहे. करमाड ते बिडकीन या 32 किमी रस्त्यासाठी 315 कोटी रुपये तर बिडकीन ते ढोरेगाव या 35.8 किमी रस्त्यासाठी 430 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण होईल आणि रिंग रोडचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. औद्योगिक वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच शहरातील वाहतूक दडपण कमी होईल आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातही मोठी सोय होईल. या प्रकल्पामुळे पुढील काही वर्षांत संभाजीनगर हा राज्यातील एक प्रमुख औद्योगिक व व्यापार केंद्र म्हणून नव्या उंचीवर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






