Sambhaji Nagar Election 2026 : नव्या चेहऱ्यांना संधी देणं भोवलं? इम्तियाज जलीलांच्या कारवर कुणी हल्ला केला? संतापजनक प्रकार

Written by:Smita Gangurde
Published:
एमआयएमचे माजी खासदार छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा प्रचार करीत होते. प्रचार रॅलीदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
Sambhaji Nagar Election 2026 : नव्या चेहऱ्यांना संधी देणं भोवलं? इम्तियाज जलीलांच्या कारवर कुणी हल्ला केला? संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026 : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली आहे. एमआयएमच्या अंतर्गत नाराजीतून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. तर हल्लेखोरांना शिंदे सेना-भाजपाची फूस असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. (Attack on Imtiaz Jaleel’s car)

एमआयएमचे माजी खासदार छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा प्रचार करीत होते. प्रचार रॅलीदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती आहे. बायजीपुरा-जिन्सी परिसरात ही घटना घडली. एमआयएमच्या काही नाराज कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेपूर्वी काही कार्यकर्त्यांनी जलील यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला होता. जलील यांनी पैसे घेऊन तिकिटे वाटल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

इच्छुकांना उमेदवारी नाकारल्याने प्रक्षोभ…

एमआयएमने यावेळी संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत 22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. या निर्णयामुळे पक्षात आधीपासूनच असंतोष होता, तीच नाराजी व्यक्त झाल्याचं सांगण्यात येतंय. परिस्थिती चिघळत चालल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. सुरुवातीला हा हल्ला काँग्रेसनं केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र काँग्रेसनं हा आरोप फेटाळत, स्टंट करण्यासाठी इम्तियाज जलील यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केलाय.

महायुतीच्या नेत्यांवर आरोप…

या घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणार असल्याचं म्हटलंय. या गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपा मंत्री अतुल सावे यांचं संरक्षण असल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे शिरसाटांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यात सगळ्याच पक्षात इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर निषेध व्यक्त करण्यात आला. सगळ्याच पक्षात बंडखोरीही झालेली पाहायला मिळाली. मात्र संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी थेट नेत्याच्या गाडीवरच हल्ला केला. या हल्ल्याचे आगामी काळात राजकीय परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.