महापुरुषांच्या अवमानास शिक्षा ते शिवस्मारक, रायगडावर छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या मागण्या, काय म्हणाले मुख्यमंत्री?

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महापुरुषांचा अवमान, सिनेमेटिक लिबर्टी, शिवस्मारक यासारख्या मुद्द्यांबाबत छत्रपती उदयनराजेंनी सरकारकडे काही मागण्या केल्यात. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच सरकार म्हणून भाष्य केलंय.
महापुरुषांच्या अवमानास शिक्षा ते शिवस्मारक, रायगडावर छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या मागण्या, काय म्हणाले मुख्यमंत्री?

किल्ले रायगड – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिंवेंद्रराजे भोसले यांच्यासह आमजदार-खासदार मंडळींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खासदार उदयनराजे भोसले यांनी पाच मागण्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महापुरुषांचा अवमान, चित्रपटांतमधील सिनेमेटिक लिबर्टी यावरुन वाद सुरु आहे. या प्रकरणी काही जणांवर कारवाईही करण्यात आलीय. मात्र महापुरुषांच्या अवमानाबाबत ठोस कायद्याची मागणी उदयनराजेंनी याहीपूर्वी केली आहे.

 

उदयनराजे भोसलेंच्या पाच मागण्या कोणत्या?

किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादनानंतरच्या या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत.

1. राजमाता जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखअया महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यात यावा. यात 10 वर्षांची शिक्षा असावी आणि हा गुन्हा अजामिनपात्र असावा अशी मागणी उदयनराजेंनी केलीय.

2. इतिहासावरुन राज्यात आणि देशात वादंग होत असतात, त्यामुळे शिवरायांचा शासनमान्य इतिहास प्रकाशित करावा, अशी मागणीही उदयनराजेंनी सरकारकडे केली आहे..

3. ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली निर्माते-दिग्दर्शक चुकीच्या बाबी सिनेमात दाखवतात. यावरुन वाद निर्माण होतात. हे वाद निर्माण होऊ नयेत यासाठी वेगळ्या सेन्सॉर बोर्डाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

4. राम सर्किटप्रमाणेच राज्यात शिव स्वराज्य सर्किटची स्थापना करण्यात यावी, अशीही मागणी उदयनराजेंनी केलीय.

5. मुंबईत समुद्रात शिवस्मारकाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ते शिवस्मारक मुंबईत राजभवनच्या ठिकाणी उभारावं अशी मागणीही उदयनराजे भोसले यांनी केलीय.

लोकशाहीनुसार कायदे करु, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्यांचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र यांनी त्यांच्या भाषणात केला. महापुरुषांचा अवमान प्रकरणी कठोर शिक्षा व्हावी अशी सरकारचीही इच्छा आहे.  असा प्रकार करणाऱ्याला टकमक टोकावरुन ढकलून द्यायला हवं. मात्र अशी शिक्षा लोकशाहीत देता येणार नाही. त्यामुळे याबाबत लोकशाहीला अनुसरुन कायदे करु असं मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या भाषणात म्हणाले आहेत.

शिवाजी महाराजांचा शासनमान्य इतिहास निर्मिती करण्याचं कामही सरकार करेल असंही मुख्यमंत्री  म्हणालेत.

शिवस्मारकाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. शिवस्मारकाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात अडकला आहे, मात्र शिवस्मारकाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.