यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बऱ्याच काळापासून या प्रकल्पातील बोगदा आणि पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा मिसिंग लिंक वाहतूकीसाठी नेमका कधी खुला होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली प्रकल्पाची पाहणी
प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही पाहणी केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, ‘मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होईल. महामार्गावरील घाटाचा भाग यामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.’
मिसिंग लिंक प्रकल्प कधी सुरू होणार?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण 94 टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.
मिसिंग लिंक प्रकल्पाचे महत्व मोठे
मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण आणि हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. त्यामुळे हा मार्ग सुरू झाल्यावर मुंबई-पुणे प्रवास अधिक सुखकर होणार आहे.






