उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खुली ऑफर, म्हणाले..

Written by:Smita Gangurde
Published:
खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडतील का? देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने संबंधित वक्तव्य मस्करीत केलं ते आगामी काळात स्पष्ट होईल.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खुली ऑफर, म्हणाले..

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकी. वैर गेल्या पाच ते सहा वर्षांत महाराष्ट्रानं अनुभवलंय. ज्या उद्धव ठाकरेंनी ‘एक तर तू राहशील नाहीतर मी’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज दिलं होतं. त्याच देवेंद्र फडणवीसांनी आता उद्धव ठाकरेंना थेट महायुतीत येण्याची खुली ऑफर दिली आहे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटेकेबाजी केली. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे त्याआधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची धावती भेट झाली.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले की, अंबादास दानवे यांनी पुन्हा सभागृहात यावं आणि याच पदावर काम करावं असं काही नाही. असं मी म्हणालो तर उद्धव ठाकरे म्हणतील पळवापळवी करतो. असं फडणवीस म्हणाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काहीतरी टिप्पणी केली. त्यानंतर फडणवीस म्हणाले की, उद्धवजी 2029 पर्यंत आमचा विरोधी बाकांवर येण्याचा काहीच स्कोप नाहीच. पण तुम्हाला इकडे म्हणजे सत्ताधारी बाकांवर येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. त्याचा विचार वेगळ्या पद्धतीनं करता येईल.

उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंना दिलेल्या या खुली ऑफरची चर्चा त्यानंतर विधिमंडळ परिसरात होती. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अंबादास दानवे यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंना चिमटे काढले. संघाच्या आणि भाजपाच्या मुशीत तयार झालेला चांगला कार्यकर्ता तुम्ही मला दिलात, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानलेत. विधिमंडळाच्या बाहेर त्यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, मुख्यमंत्र्यांचं विधान खेळीमेळीच्या वातावरणात घ्यायला हवं, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

फोटोसेशनचीही चर्चा

अंबादास दानवेंच्या निरोप समारंभावेळी विधिमंडळ परिसरात सर्वपक्षीय फोटोसेशन पार पडलं. मात्र यावेळी उद्धव ठाकरेंची एन्ट्री होताचा ड्रामा बघायला मिळाला. पहिल्या रांगेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांसह महत्वाचे नेते बसले होते. उद्धव ठाकरे येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपलं तोंड फिरवलं. यावेळी उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंनी आपली खुर्ची त्यांना देऊ केली मात्र बाजूला एकनाथ शिंदे असल्यानं उद्धव ठाकरेंनी बसणं टाळलं
एक खुर्ची सोडून निलम गोऱ्हे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाजूला बसणं पसंत केलं. विशेष म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेम आले होतं

फोटोसेशननंतर उद्धव-मुख्यमंत्री भेट

दरम्यान, हे फोटोसेशन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वत:हून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांजवळ जाऊन भेट घेतली. यावेळी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही सेकंदाचा संवाद बघायला मिळाला. आधी विधिमंडळ परिसरात फडणवीस-ठाकरे यांच्यातील भेट, त्यानंतर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर देणं. आणि फोटोसेशनवेळी उद्दव ठाकरेंनी भेट घेणं या सर्व घटनाक्रमामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

फडणवीसांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपची अनेक वर्ष युती होती. पण शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
पण आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडतील का? देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने संबंधित वक्तव्य मस्करीत केलं ते आगामी काळात स्पष्ट होईल.