पुणे– पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाविरोधात नव्या वादाची ठिणगी पडली आहे यामागचं कारण म्हणजे आहे ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ नावाची वक्तृत्व स्पर्धा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं ही स्पर्धा भरवण्याला विरोध होतोय.

या वक्तृत्व स्पर्धेतून विद्यापीठात राजकारण होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं आंदोलनाचं हत्यार उपसलंय. तर विकसीत महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित असलेली ही वक्तृत्व स्पर्धा मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेऊन करण्यात आल्याचं विद्यापीठाचं म्हणणं होतं, मात्र झालेल्या या विरोधानंतर विद्यापीठानं परिपत्रक मागे घेतलं, त्यावरुन पुन्हा राजकारण तापलंय.

विद्यापीठाच्या निवदेनात काय म्हटलं होतं?

‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून ती आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा तरुणांना ‘विकसित महाराष्ट्र’ या दृष्टीकोनाशी जोडणारी आणि त्यांच्या नेतृत्व वक्तृत्व कौशल्यांना विकसित करणारं एक सशक्त व्यासपीठ आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्रातील १४ ते २५ वयोगटातील तरुण तरुणींसाठी खुली असून, स्पर्धेचा मुख्य विषय ‘विकसित महाराष्ट्र’ हा आहे. तसंच स्पर्धा विविध टप्प्यात विभागलेली आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील सर्व NSS च्या स्वयंसेवकांना या स्पर्धेबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्यासाठी सूचित करण्यात यावं

रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांची टीका

‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ या स्पर्धेच्या निमित्तानं नव्या राजकारणालाही तोंड फुटलंय. आमदार रोहित पवारांनी पोस्ट करत जोरदार निशाणा साधलाय. रोहित पवारांनी लिहिलं की, विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचे नसते याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचे संपूर्ण देश बघत आहे. आता शिक्षणाची मंदिरे असलेली विद्यापीठे देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच Voice of Democracy मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर टीका केलीय.

भाजपाचं काय प्रत्युत्तर

भारतीय जनता पक्षानंही या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण नको, असं आमदार जयकुमार गोरे म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्यांच्या अनेक स्पर्धा याआधी झाल्या आहेत, व्हिजन ठेवून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत
मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांवर स्पर्धा झाली तर वाईट वाटायची गरज नाही, असा टोला गोरे यांनी काँग्रेसेला लगावलाय. जे व्हिजन फडणवीसांकडे आहे, त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असंही गोरे म्हणाले आहेत.

विरोधानंतर विद्यापीठाकडून परिपत्रक मागे

‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ स्पर्धा राबवण्याची आणि त्याच्या प्रचाराची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS च्या विद्यार्त्यांवर सोपवण्यात आली होती. मात्र ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ स्पर्धेला विरोध झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळाकडून परिपत्रक काढून टाकण्यात आलंय. या स्पर्धेशी विद्यापीठाचा काही संबंध नाही, विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं एवढाच हेतू यामागे होता असं स्पष्टीकरण राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख सदानंद भोसलेंनी दिलंय ‘व्हाइस ऑफ देवेंद्र’ वक्तृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं परिपत्र मागे घेतलंय

रोहित पवारांनी पुन्हा डिवचलं

विद्यापीठीनं परिपत्रक मागे घेतलं यावरूनही आमदार रोहित पवारांनी पुन्हा डिवचलंय. रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘व्हाइस ऑफ देवेंद्र’ या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागं घेण्याची उपरती झाली. पण ‘एकीकडं व्हाइस ऑफ देवेंद्र’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेलं पत्र मागे घ्यायचं, हा विद्यापीठाचा दुटप्पीपणा आहे. अशी डबल ढोलकी वाजवून छुप्या पद्धतीने आपला राजकीय अजेंडा राबवणं, योग्य नाही.

शिक्षणाचं मंदिर असलेल्या विद्यापीठांच्या माध्यमातून राजकीय अजेंडे राबवण्याचा विषय हा केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर असे अनेक विषय आहेत, महिन्याअखेरपर्यंत विद्यापीठातील या राजकीय अजेंड्यांच्या संदर्भातील सर्व विषयांची पोलखोल करू. मुळात विद्यापीठाने ही नसती उठाठेव का केली ? किमान विद्यापीठासारखे ज्ञानदानाचे पवित्र क्षेत्र तरी राजकारणापासून अलिप्त रहावे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सतर्क तथा सक्रिय असावे. भविष्यात असा आचरटपणा विद्यापीठाकडून होणार नाही अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. असं रोहित पवार म्हणालेत.