मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती विरुद्ध भाजपा-शिंदे सेना असा संघर्ष रंगल्याचं महापालिका निवडणुकीत पाहायला मिळालं. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, मराठी अस्मिता, अदानींना दिलेल्या जागा आणि मुंबईचा विकास हे प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे ठरले.
देशाची आर्थिक राजधानी आणि 75 हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्तेसाठी यावेळी मोठा संघर्ष रंगलाय.
ठाकरे बंधू एकत्र
25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर असलेल्या ठाकरेंच्या वर्चस्वाला भाजपा आणि शिंदे शिवसेनेनं आव्हान दिलं.
युतीचं हे आव्हान रोखण्यासाठी 20 वर्षांनंतर मतभेद बाजूला ठेवून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले.
युतीकडून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रचार केला. तर ठाकरे कुटुंबाचा भर शाखा भेटीवर असल्याचं दिसलं.
कोणत्या मुद्द्यांवर रंगला प्रचार
मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार, कोविड काळातला भ्रष्टाचार यावर युतीकडून जोरदार प्रचार करण्यात आला.
मुंबईत गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा दाखला देत मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करण्यावर युतीकडून भर देण्यात आलाय. तर 25 वर्षांत केलेली कामं, या आधारावर मतं मागत असल्याचं ठाकरेंकडून सांगण्यात आलं.
मुंबई तोडण्याचा डाव असून, मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही निवडणूक असल्याचा मुद्दा ठाकरेंनी सातत्यानं मांडला. तर मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, असं सांगत ही लढाई मराठी माणसाच्या नव्हे तर ठाकरेंच्या अस्तित्वाची असल्याची टीका युतीकडून करण्यात आली.
अदानींचा मुद्दाही निवडणुकीत महत्त्वाचा
गौतम अदानी यांना मुंबईत देण्यात येत असलेले प्रकल्प हा मुद्दा ठाकरेंनी मांडला. अदानींना मुंबई आंदण देऊन, पालघरचा विकास करुन मुंबईवर गुजरातचं अतिक्रमण होत असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला. तर उद्योगपतींना नाकारुन मुंबईचा विकास कसा होणार, रोजगार कसे मिळणार, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.
कोण बाजी मारणार?
ठाकरे कुटुंबाकडून शाखा भेटी, प्रचार रॅली यावर अधिक भर देण्यात आला. मुंबईत एकच ठाकरेंची मोठी सभा झाली. तर भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडूनही प्रचाराची राळ उडवून देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईभरात अनेक ठिकाणी सभा झाल्या. काँग्रेस-वंचित आघाडी, अजित पवार राष्ट्रवादी हेही पक्ष या निवडणुकीत मैदानात असले तरी मुंबईची खरी लढाई ही ठाकरे विरुद्ध भाजपा अशीच असल्याचं स्पष्ट दिसतंय. आता प्रचाराचा धुराळा शांत झालाय, आता या युद्धात कोण बाजी मारणार, हे पाहावं लागणार आहे.





