खळखट्याकच्या ट्रेलरनंतर मराठीला विरोध करणाऱ्या माजोरड्या केडियाला घडली अद्दल, राज ठाकरेंकडे माफीनामा

Written by:Smita Gangurde
Published:
आपण केलेली एक्स पोस्ट चुकीच्या मनस्थितीत आणि तणावात केल्याचं केडियानं म्हटलय. या एक्स पोस्टनंतर आलेल्या प्रतिक्रियांनंतर ट्विट मागे घेत असल्याचं केडियानं म्हटलंय.
खळखट्याकच्या ट्रेलरनंतर मराठीला विरोध करणाऱ्या माजोरड्या केडियाला घडली अद्दल, राज ठाकरेंकडे माफीनामा

मुंबई- महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही, अशी मुजोरी दाखवणारा अमराठी उद्योजक सुशील केडियाला मनसेनं चांगलीच अद्दल घडवलीय. मराठी शिकत नाही, काय करणार बोल? अशा एकेरी भाषेत राज ठाकरेंचा अपमान करणारी पोस्ट सुशील केडियानं केली होती.
मात्र दोन दिवसांतच या केडियाची हेकडी निघाली. राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना चॅलेंज देणाऱ्या केडियाला मनसेच्या केवळ 5 महाराष्ट्र सैनिकांनी अद्दल घडवली..

मराठी विजय मेळाव्याच्या दिवशीच मनसैनिक सकाळी सकाळीच केडियाच्या ऑफिसवर धडकले. ऑफिसच्या काचेवर नारळ फोडून त्यांनी चांगलाच प्रसाद दिला. मनसेच्या खळखटॅक स्टाईल आंदोलनाचा ट्रेलर चांगलाच कामी आला.

मनसेच्या दणक्यानंतर माफीनामा

हा ट्रेलर पाहूनच सुशील केडियाची बोबडी वळली. आपली चूक झाल्याचं त्यानं कबूल केलं. राज ठाकरे आणि मराठी माणसांची माफीही मागितली. आपण केलेली एक्स पोस्ट चुकीच्या मनस्थितीत आणि तणावात केल्याचं केडियानं म्हटलय. या एक्स पोस्टनंतर आलेल्या प्रतिक्रियांनंतर ट्विट मागे घेत असल्याचं केडियानं म्हटलंय. इतकी वर्ष महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांसारखी सफाईदार मराठी बोलू शकत नाही, असं केडियानं म्हटलय. राज ठाकरेंच्या राष्ट्रप्रेमाचा आदर असल्याचं सांगत केडियानं राज ठाकरेंची माफी मागितली आहे. सध्याच्या स्थितीत श्वास कोंडत असल्याचं सांगत चांगलं मराठी बोलण्यासाठी मदत करण्याची इच्छाही केडियानं व्यक्त केलीय.

केडियाच्या मराठी शिकणार नाही, या आधीच्या पोस्टनंतर मनसेनं तीव्र प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान केलात तर कानफटात बसेल अशी भूमिका मनसेनं घेतली होती. मर्यादेत राहण्याचा सल्लाही केडियाला देण्यात आला होता. राज ठाकरेंनी भाषणात केडियाचा उल्लेख करत मराठीचा अपमान सहन करणार नाही, असं केल्यास कानफटातच बसेल अशी प्रतिक्रिया दिली होती.

कोण आहे सुशील केडिया?

सुशील केडिया गुंतवणूकदार आहे. केडियानॉमिक्स मार्केट रिसर्च फर्मचा संस्थापक आहे. आर्थिक क्षेत्रातील उलाढालींचा २५ वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. अमेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांसोबत त्यानं काम केलेलं आहे.