इयत्ता अकरावीची महाविद्यालय निवड यादी कधी जाहीर होणार? जाणून घ्या तारीख

Written by:Rohit Shinde
Published:
प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) 2025 CAP फेरी 1 ची गुणवत्ता यादी आता 30 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी या यादीच्या प्रतीक्षेत होते.
इयत्ता अकरावीची महाविद्यालय निवड यादी कधी जाहीर होणार? जाणून घ्या तारीख

अकरावी प्रवेश हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतरच करिअरचा योग्य दिशा ठरते. विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेची निवड भविष्यातील संधींवर प्रभाव टाकते. त्यामुळे अकरावीचा अभ्यासक्रम गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, अभ्यास आणि योजना यामुळे उज्वल भवितव्य शक्य होते. मात्र यंदा राज्यात या प्रवेश प्रक्रियेत चांगलीच दिरंगाई पाहायला मिळत आहे.

दहावीचा निकाल लागून दीड महिना उलटला आहे. मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तांत्रिक अडचणींनंतर महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अकरावीसाठी महाविद्यालय निवड यादी जाहीर करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार?

महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) 2025 CAP फेरी 1 ची गुणवत्ता यादी आता 30 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. याआधी ही यादी 26 जून रोजी जाहीर होणार होती, मात्र काही समस्यांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेला देखील गती मिळणार आहे.

कशी मिळेल गुणवत्ता यादी?

FYJC ची पहिली यादी mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. गुणवत्ता यादीसोबत राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी कट-ऑफ गुण आणि इतर डेटा देखील प्रसिद्ध केला जाणार आहे. सेंट्रलाइज्ड अॅडमिशन प्रोसेस (CAP) मध्ये 12.7 लाखांहून अधिक विद्यार्थी भाग घेतलेला आहे. या द्वारे 9435 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तुम्हाला CAP फेरी 1 साठी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. तसेच इतर सर्व महाविद्यालयांसाठी संपूर्ण कट-ऑफ यादीही पाहता येईल. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याते आवाहन केले आहे.

सर्वप्रथम mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर जा. FYJC पहिली गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणजे अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका आणि एंटर करा. यानंतर तुम्हाला मिळालेले कॉलेज पहा आणि यादी डाउनलोड करा.