पावसाळापूर्व कामे पूर्ण करा आणि यंत्रणा सज्ज ठेवा, पालिका आयुक्त यांचे निर्देश

Written by:Astha Sutar
Published:
पालिका क्षेत्रामध्ये कोणत्याही घटनेसाठीचा प्रतिसाद म्हणून शहरी भागांमध्ये तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगर येथे 'राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक' यांची एक तुकडी तैनात ठेवण्यात यावी. आपत्ती प्रसंगी या तुकडीला घटनास्थळी तातडीने पोहचण्यासाठी विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडॉर) वाहतूक पोलिसांनी तयार करून देण्यात यावा.
पावसाळापूर्व कामे पूर्ण करा आणि यंत्रणा सज्ज ठेवा,  पालिका आयुक्त यांचे निर्देश

BMC : राज्यात मान्सून 7 जुन रोजी दाखल होणार आहे. यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, म्हणून तसेच नाले सफाई आदी कामे पावसाळापूर्व पूर्ण करा आणि यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

नागरिकांची गैरसोय होणार याची काळजी घ्यावी..

दरम्यान, मॅनहोलची झाकणे खुली राहणार नाहीत यासाठीची खबरदारी घ्यावी. तसेच रेल्वे परिसरामध्ये पाणी साचून उपनगरीय लोकल वाहतूक विस्कळीत होणार नाही, यासाठी रेल्वे आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाने संयुक्तपणे काम करावे, असेही निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले. तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनांमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, या अनुषंगाने उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत समन्वय साधून पंप आणि डिझेल जनरेटर संच बसवण्याचे नियोजन करावे. असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले. यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न झाली.

वृक्षांच्या फांद्या छाटण्याची कार्यवाही करावी…

दुसरीकडे मोबाईल टॉवरच्या अनुषंगानेही संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित कंपन्यांना दिले. कोणतीही दुर्घटना घडू नये याअनुषंगाने संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करत पुरेशी काळजी घ्यावी, असेही त्यांनी आदेशित केले. तसेच वृक्षांच्या फांद्या छाटण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध प्राधिकरणांच्या अखत्यारितील जागेवर जाहिरात फलक आहेत. हे जाहिरात फलक सुस्थितीत असल्याबाबत संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची खात्री करावी. ज्या फलकांसाठीचे संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही, अशा फलकांचा परवाना रद्द करावा, असे निर्देश डॉ. शर्मा यांनी बैठकी दरम्यान दिले.