महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान काँग्रेस व विरोधक करताहेत, मग तुम्ही काय झोपला होता का? आशिष शेलारांचा सवाल

Written by:Astha Sutar
Published:
पुन्हा वाढलेल्या मतदानाचा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फायदा झाला तर तो चालतो, पण विधानसभा निवडणुकात त्यांना लोकांनी नाकारलं तर ते मात्र चालत नाही, याचे आश्चर्य वाटते. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे.
महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान काँग्रेस व विरोधक करताहेत, मग तुम्ही काय झोपला होता का? आशिष शेलारांचा सवाल

Ashish Shelar : काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात ५.३० नंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप केला आहे. याला भाजपा नेते आशिष शेलारांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. कॉँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालवलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टिकाच करायची असेल तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यावा, लोकांनी मतपेटीतून दिलेला जबरदस्त धक्का कॉन्ग्रेस आणि माविआला पचवता आलेला नाही, असा टोलाही शेलारांनी लगावला आहे.

तेव्हा काय करत होते?

निवडणुक आयोग त्यांची बाजू मांडेल परंतु जेव्हा मतदार याद्या आक्षेपांसाठी प्रारूप याद्या जाहिर झाल्या तेव्हा विरोधकांनी काहीच केले नाही. तेव्हा केवळ ३९०० आक्षेप दाखल झाले होते त्यातील केवळ ९८ आक्षेप वैध ठरले होते अशी माहितीही माझ्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. मग तेव्हा काय हे झोपले होते का, असा सवाल शेलारांनी उपस्थित केला. आता मतदार याद्यांवर आणि मतदान प्रक्रियेवर गळे काढणाऱ्या विरोधकांनी, विशेषतः कॉन्ग्रेसने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यावर आक्षेप घेतला नव्हता, याकडेही आशीष शेलार यांनी बोट ठेवले.

दुतोंडीपणा माविआने बंद करावा…

जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, त्यानुसार लोकांनी अधिकाधिक संख्येने मतदान केले यात चुक काय असे विचारून आशीष शेलार म्हणाले की, मतदान वाढले तरी यांची तक्रार असते, मतदार याद्यांची स्वच्छता केली तरी कडतात, हा दुतोंडीपणा माविआने आधी बंद केला पाहिजे. माविआ आणि कॉन्ग्रेस जे सांगत आहेत की शेवटला मतदान वाढले, त्यांनी दिवसभराची दर तासाची आकडेवारीही सांगावी, ती का लपवली जाते, असा सवाल आशीष शेलार यांनी उपस्थित केला.