भाजप मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का देणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण, हिंगोली हा काँग्रेस आणि सातव कुटुंबियांचा अभेद्य किल्ला होता. त्यालाच भाजपने सुरुंग लावला. माजी खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोविड काळात सातव यांना काळाने हिरावले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व दिले होते. भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा झटका ठरणार आहे.
प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार ?
डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 या काळात हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ओळख होती. पण 2021 मध्ये कोविड काळात त्यांचा मृत्यू अनेकांना धक्का देणारा ठरला. त्यांच्यानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना राजकारणात आणले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणूनही काम पाहत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना गळती लागली असून काँग्रेसला सर्वाधिक धक्के बसत आहे. माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, कुणाल पाटील हे भाजपवासी झाल्यानंतर आता काँग्रेसचे माजी खासदार दिवगंत राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यादेखील काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या भाजप प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
सातव परीवार आणि काँग्रेस संबंध
प्रज्ञा सातव सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत आणि विधान परिषदेच्या आमदार आहेत. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेवर त्या २०२१ मध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आल्या असून त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. २०१४ मध्ये देशभरात मोदी लाटेत काँग्रेस भुईसपाट झाली होती. महाराष्ट्रातही काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे इतके घनिष्ठ संबंध असताना सातव काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे.





