Marathi News

आषाढी वारीच्या दिंडीत काँग्रेस सहभागी होणार, मंगळवारी हर्षवर्धन सपकाळसह काँग्रेस नेते दिवसभर दिंडीसोबत चालणार

Written by:Astha Sutar
Published:
आज जातीपातीच्या, धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा आहे. या वारी परंपरेचा वारसा आपल्याला जपला पाहिजे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेत एक दिवस तरी वारी अनुभवावी म्हणून दिंडीत सहभागी होऊया, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
आषाढी वारीच्या दिंडीत काँग्रेस सहभागी होणार, मंगळवारी हर्षवर्धन सपकाळसह काँग्रेस नेते दिवसभर दिंडीसोबत चालणार

Congress – 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. पंढरपूरच्या या वारीकडे भक्त आतुरतेनं वाट पाहत असतात. वारी ही भक्तांसाठी एक पर्वणी असते. वारी करणे म्हणजे जन्माला आल्याचे सार्थक करण्यासारखे आहे. अशी भावना भक्तामध्ये आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटले जाते. पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. दरम्यान, आता पंढरपूरच्या आषाढी वारीत अनेक सामाजिक संस्था सहभागी होत भक्तांची विविध सोय करताना दिसताहेत. मात्र आता या वारीत काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार आहे.

दिंडी क्रमांक २८२ मध्ये सपकाळ दिडींत चालणार…

दरम्यान, मंगळवार दिनांक २४ जून रोजी सपकाळ हे दिंडीत सहभागी होत असून ते दिवसभर दिंडीसोबत चालणार आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत गावातून दिंडी क्रमांक २८२ मध्ये सकाळी ७ वाजता हर्षवर्धन सपकाळ सहभागी होतील व वरवंड गावापर्यंत पायी चालतील. आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. वारीत सहभागी होऊन विठ्ठल भक्तीत रममान होण्याचा मानस अनेकांचा असतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही वारीत चालण्याचा संकल्प केला आहे.

महाराष्ट्राला एक अध्यात्मिक वारसा…

“पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या वारीत कोणताही जात, धर्म, पंथ न पहाता शेकडो वर्षांपासून हा विठ्ठल भक्तीचा प्रवास सुरु आहे. सर्वजण विठ्ठ्लाच्या ओढीने पंढरपूरकडे पायी चालत जातात. महाराष्ट्र धर्म जागवण्याचे काम या वारीच्या माध्यमातून होत आहे. सर्वसामान्य भक्तांचा सखा विठुराया अशी सावळ्या विठूची ख्याती आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा असंख्य संतांनी महाराष्ट्राला एक अध्यात्मिक वारसा घालून दिला आहे. पंढरपूरची वारी व संत परंपरा हीच भारताची खरी ओळख सांगणारा आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews