Marathi News

शक्तिपीठ महामार्ग खरंच गरजेचा?’ सामनातून राज्य सरकारला सवाल

Written by:Rohit Shinde
Published:
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी वर्गातून मोठा विरोध झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं, त्यानंतर आता सामानातून राज्य सरकारला सवाल विचारण्यात आले आहेत.
शक्तिपीठ महामार्ग खरंच गरजेचा?’ सामनातून राज्य सरकारला सवाल

शेतकऱ्यांचा मोठा विरोध झुगारत नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग होणारच हे आता स्पष्ट दिसत आहे. यासाठी जवळपास 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परंतु या महामार्गाची खरंच गरज आहे का, असा सवाल आता सामनातून विचारण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांचा विरोध झुगारून हा मार्ग करत असल्याने मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

शेतकऱ्यांचा विरोध झुगारून महामार्ग होणार?

महाराष्ट्राच्या शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने तब्बल 20,787 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून ते पश्चिमेकडील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या खर्चाला मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून 12 हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.  या निधीतून सुमारे 7 हजार 500 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असून, त्यातून पर्यटन, वाहतूक आणि ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.

महामार्गाची गरज आहे का?, सामनातून सवाल

‘महाराष्ट्रातील सवातीन लाख हेक्टर शेतजमीन आतापर्यंत बिगरशेती कारणांसाठी वापरली गेली आहे. त्यात शक्तिपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या साडेसात हजार हेक्टरची भर पडेल. राज्यातील 12 जिल्हे आणि 39 तालुक्यांतील हजारो हेक्टर पिकाऊ शेतजमीन आणि तिच्यावर पोट भरणारी हजारो शेतकरी कुटुंबे यांना ‘भकास’ करायचे व आम्ही ‘गतिमान विकास’ केला म्हणून ऊर बडवून घ्यायचा. रस्ते, महामार्गांची निर्मिती व्हायला आक्षेप असण्याचे कारण नाही, पण ‘शक्तिपीठ महामार्ग’ ही महाराष्ट्राची आजची तातडीची गरज आहे का? सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे.’ असं सामनात नमूद करण्यात आलं आहे.

शक्तिपीठ महामार्गाचे महाराष्ट्रासाठीचे महत्व

शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात विविध शक्तीपीठे जसे की तुळजाभवानी (तुळजापूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), रेणुका माता (महुर), सaptश्रृंगी (वणी) ही श्रद्धास्थाने आहेत. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. शक्तीपीठ महामार्ग तयार झाल्यास या तीर्थक्षेत्रांना जोडणारी वाहतूक सुलभ होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील. त्याचप्रमाणे रस्ते विकासामुळे गावांमध्ये सामाजिक व आर्थिक प्रगती घडेल. हा महामार्ग धार्मिक पर्यटनाबरोबरच सांस्कृतिक एकात्मतेचा प्रतीक ठरेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम शक्तीपीठ महामार्ग करेल. त्यामुळे तो राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews