माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीची दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू; दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित

Written by:Rohit Shinde
Published:
माळेगाव कारखाना निवडणुकीची दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे पाच वाजता सुरू झाली असून याचा निकाला दुपारी 12 पर्यंत अपेक्षित आहे. अवघ्या राज्याचं निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष आहे.
माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीची दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू; दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून आज बुधवार, 25 जून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती.

निलकंठेश्वर पॅनलची आघाडी कायम

आतापर्यंतच्या मतमोजणीचा कल पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलला यश मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या 16 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत. अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती आहे. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी या कारखान्याला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. याचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता होती.

याशिवाय, अजित पवार हे सध्या सत्ताधारी असल्याने मतदारांचा कल त्यांच्या बाजूला जास्त असू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. त्यामुळे अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी किती जागा जिंकणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. आतापर्यंतची परिस्थिती पाहता अजित पवार यांच्या पॅनलला मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

निवडणुकीत क्रॉस मतदान; कुणाला फायदा?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची बाब कालच्या मतमोजणीतून समोर आली होती. माळेगाव, सांगवी, पणदरे गटात क्रॉस वोटिंग झाले होते. क्रॉस वोटिंगचा फटका नेमका कोणाला बसणार, हे बघावे लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ब वर्ग गटातून विजयी झाले होते.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, अशी चार पॅनेल  रिंगणात होती. त्यामुळे आज दुपारी लागणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे. याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा…

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews