महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात अंमली पदार्थांची वाढती तस्करी आणि ड्रग्ज कारखान्यांची संख्या ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. युवकांना सहजपणे लक्ष्य करून या अवैध व्यवसायाचा विस्तार केला जात आहे. मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत ड्रग्ज पोहोचत असून यामुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत आहे. अंमली पदार्थांमुळे गुन्हेगारी वाढ, आरोग्य समस्या आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण होत आहे. पोलिस व तपास यंत्रणा कारवाई करत असल्या तरी तस्करांचे जाळे अधिक व्यापक आणि संघटित होत चालले आहे. त्यामुळे कठोर कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्र सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. बंगळुरूत तीन बेकायदेशीर एमडी ड्रग्ज उत्पादन कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. ₹55.88 कोटी किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
नवी मुंबई ते बंगळुरू ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
महाराष्ट्र एएनटीएफने बेंगळुरूमध्ये तीन बेकायदेशीर एमडी ड्रग उत्पादन कारखाने उद्ध्वस्त केले आहेत आणि ₹55.88कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने बेंगळुरूमध्ये मोठ्या कारवाईत मेफेड्रोन नावाचे सिंथेटिक ड्रग बनवणाऱ्या तीन बेकायदेशीर कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अंदाजे ₹55 कोटी 88 लाख 90 हजार किमतीचा एमडी स्टॉक जप्त करण्यात आला. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे, तर दोघे फरार आहेत.






