Anil Parab – Yogesh Kadam – कांदिवली येथे पोलिसांनी मे महिन्यांत सावली बारवर कारवाई केली. २२ बारबाला, २२ ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांना पकडले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे हा डान्सबार आहे, असा खळबळजनक गौप्यस्पोट शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. दरम्यान, रत्नागिरीतील वाळू उपसा आणि डान्सबारचे सर्व पुरावे असून, गृहराज्यमंत्री कदम यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
२२ बारबाला, २२ ग्राहक, ४ कर्मचाऱ्यांना अटक
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाच्या अंतिम प्रस्तावावर परब यांनी भूमिका मांडली. राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेवर सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबईतील कांदिवली भागात झालेल्या डान्सबारचा उल्लेख करत, राज्यगृहमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. मे महिन्यांत पोलिसांनी सावली बारवर धाड टाकली. २२ बारबाला, २२ ग्राहक, ४ कर्मचाऱ्यांना अटक केली.
हे ही वाचा
त्यापैकी ग्राहकांवर गुन्हा दाखल केला गेला. परंतु, राज्यात डान्सबार बंदी असताना हा बार सुरू कसा, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असता, त्या बारचा परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे.
गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
गृहराज्यमंत्री यांच्या त्या आई असल्याचा गंभीर आरोप केला. एकीकडे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद मागत असून दुसरीकडे आया बहिणींना डान्सबारमध्ये नाचवत आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी परिषदेत केली. मात्र, कारवाई न केल्यास सरकारचा पाठिंबा असल्याचे सिद्ध होईल, असे परब म्हणाले.
वाळू थेट महसूल राज्यमंत्र्यांकडे जाते…
दरम्यान, गृहराज्य मंत्र्यांकडून कायदे पायदळी तुडवले जात असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामांवर साशंकता निर्माण होत आहे, असे म्हणत परब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. राज्यातील अनधिकृत वाळू उपसा आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत सरकारला धारेवर धरले. रत्नागिरीत महसूल राज्यमंत्री यांच्या कृपेने अवैध उपसा सुरू आहे. वाळू काढल्यानंतर पहिल्यांदा गरिबांना वाळू देण्याचे धोरण आहे. मात्र, असे न करता ही वाळू थेट महसूल राज्यमंत्र्यांच्या दंत विद्यालयात जाते.
माझ्या बदनामीचा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे सर्व पुरावे व कागदपत्रे अनिल परब यांनी द्यावेत. ते तपासून त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. तर, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्यावरील आरोप निराधार असून मला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले आहेत. आईचे नाव यात गुंतविण्यात आले असून योग्य वेळी हे आरोप आणि सर्व पुरावे खोटे आहेत हे कागदपत्रासह सिद्ध करेन, असे सांगितले.