नर्तिका दिपाली पाटीलच्या लॉजमधील आत्महत्येचं खरं कारण आलं समोर; संदीप गायकवाडने ‘या’ गोष्टीसाठी टाकला दबाव?

Written by:Rohit Shinde
Published:
अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आता या आत्महत्येचे खरे कारण समोर आले आहे.
नर्तिका दिपाली पाटीलच्या लॉजमधील आत्महत्येचं खरं कारण आलं समोर; संदीप गायकवाडने ‘या’ गोष्टीसाठी टाकला दबाव?

अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून दीपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवाशी आहे. आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. या आत्महत्येमागे भाजपाचा माजी नगरसेवक संदीप गायकवाड असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत या संदर्भात आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

संदीप गायकवाडचा दिपालीवर लग्नासाठी दबाव?

जामखेडच्या खर्डा रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या दिपाली पाटील, वय 35 ‘या’ नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेत असलेल्या राजकीय कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संदीप सुरेश गायकवाड या व्यक्तीच्या दबावामुळे दिपाली पाटील हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा माजी नगरसेवक असलेल्या संदीप गायकवाड याने दिपालीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता.

विशेष म्हणजे संदीप गायकवाड याचे लग्न झाले आहे. तरीही त्याला दिपाली पाटील हिच्याशी लग्न करायचे होते. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संदीप गायकवाड हा दिपालीला त्रास देत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप गायकवाड याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या जामखेडच्या राजकीय वर्तुळात या घटनेची प्रचंड चर्चा रंगली आहे. संदीप गायकवाड हा स्वत: भाजपचा माजी नगरसेवक होता. तर संदीप गायकवाड यांची पत्नी लता गायकवाड यांनी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे. याचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे.

दिपालीची आत्महत्या ; नेमकं काय घडलं होतं ?

सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. तसेच, दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. त्यामुळे, मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रुम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवला. त्यानंतर अखेर भाजपाचा माजी नगरसेवक संदीप गायकवाडला अटक करण्यात आली. याबाबत, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी घटनेच्या विरोधात आवाज उठवला होता.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews