Dattatreya Bharane : शेतकरी जगला, तरच देशाचा विकास होईल. त्यामुळे कृषी योजनांची आखणी करताना शेतकऱ्याच्या गरजांचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे, शेतकऱ्यांचे हित हेच आपल्या कामाचे केंद्रबिंदू असले पाहिजे, असं राज्याचे नव नियुक्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे, आज त्यांनी कृषी विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

नुकसानीचे त्वरित पंचनामे करा…

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यावर महसूल विभागाशी समन्वय साधून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच जे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेवा देतात, त्यांना सुद्धा अत्याधुनिक सोयी सुविधा दिल्या जातात. विभागाने डिजिटायझेशनवर भर देण्याची सूचना दिली. मात्र, कोणताही कर्मचारी कामात हलगर्जीपणा दाखवेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल, हेही त्यांनी ठणकावून सांगितले. उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि सन्मान केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

‘किसान कॉल सेंटर’ सुरु करणार

दुसरीकडे शेतकरी जेव्हा संकटात असतो, तेव्हा त्याला त्वरित सल्ला आणि मदतीची गरज असते. त्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर आवश्यक आहे, शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्याची सूचना भरणे यांनी यावेळी केली. “नवीन तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कृषी विभागाने करावा. आपले प्रधान सचिव टेक्नोसेव्ही असून त्यांचा अनुभव ‘पोकरा’ प्रकल्पामधून आलेला आहे. त्याचा उपयोग विभागाच्या कामात नक्कीच होईल.” असा विश्वास भरणेंनी व्यक्त केला.