Sharad Pawar and Ajit Pawar will come together : महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर आता पवार काका-पुतणे एकत्र येतील, हे आता दिसू लागलंय. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पवार काका-पुतण्यांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. दोन्ही नेत्यांनी या निर्णयाला हिरवा कंदिल दिलाय. त्यामुळं दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. पुणे-पिंपरी चिंचवडसह राज्यभरात महापालिका निवडणुकांत पवार काका-पुतण्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीत पवार काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीनंतर राज्यात जिल्हा परिषदा निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यातच आता दोन्ही पक्षांचे उमेदवार घड्याळ या एकाच चिन्हावर लढण्यासही हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
1. युतीत शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार
2. घड्याळ चिन्हाचा निर्णय घेण्याची मुभा स्थानिक पदाधिकाऱ्यांना
3. शरद पवारांच्या उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावर लढता येणार
4. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडून निर्णय मान्य
राष्ट्रवादीचा झेपी निवडणुकातही एकत्र राहण्याचा निर्णय
घड्याळ चिन्ह वापरल्यानं झेपी आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फायदा होईल, अशी शक्यता आहे. हा निर्णय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याचे संकेत असल्याचं सांगण्यात येतंय. महापालिका निवडणुकांच्या काळातच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल अशी चर्चा रंगली होती. आता एकच चिन्हावर लढत असल्यानं ही चर्चा वास्तवात येण्याची शक्यता आहे. पवार कुटुंब एकत्र येत असतील तर शुभेच्छा असतील अशी प्रतिक्रिया भाजप नेतेही देतायेत. गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांतील जवळीक वाढत असल्याचं दिसतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढण्याच्या निर्णयानंतर आता झेपी निवडणुकातही एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळं, आता ठाकरेंपाठोपाठ पवार कुटुंबही राजकारणात एकत्र राहण्याची ही नांदीत म्हणावी लागेल.





