मुंबई- ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या केंद्र सरकारच्या शालेय उपक्रमात भारतातील तब्बल 2 कोटी विद्यार्थ्यांमधून 100 विजेत्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये कणकवलीतील कोकणकन्या सावी मुद्राळे हिचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत तिचं कौतुक केलंय.
येत्या 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे मा. केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते तिचा सत्कार होणार असून दिल्लीची परेड पाहण्यासाठी तिला ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रणही आहे, असं फडणवीस यांनी सांगितलंय.
या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सावी तुझे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असंही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेत.
कोण आहे कोकणकन्या सावी?
कणकवलीतील सावी मुद्राळे ही कोकणकन्या म्हणून ओळखली जाते. कासार्डे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असून, ती तिच्या अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘लगोरी’ एकांकिकेत ‘डीजे’ची भूमिका साकारून उत्कृष्ट नायिकेचा (शालेय गट) द्वितीय क्रमांक तिनं मिळवलाय. सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार पुरस्कारही तिला मिळाला आहे. कोकणातील उदयोन्मुख कलाकार म्हणून ती ओळखली जाते.
सावी मुद्राळे ती तिच्या नाट्य सादरीकरणासाठीआणि मालवणी भाषेवर असलेल्या तिच्या प्रभुत्वासाठी ओळखली जाते. झी मराठी ड्रामा यासारखअया कार्यक्रमातही तिचा सहभाग अनेकांना भावला होता. मालवणी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यात सावी आता महत्त्वाची भूमिका निभावतेय. तिचे व्हिडीओही व्हायरल होत असून अनेक जणं तिच्या अभिनयाचे चाहते आहेत.
काय आहे प्रोजेक्ट वीरगाथा?
शाळकरी विद्यार्थ्यांना देशातील शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्यकथा आणि बलिदानाबद्दल माहिती देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लहानग्यांत देशभक्ती आणि नागरिक कर्तव्ये यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. यात विद्यार्थ्यांना कविता, निबंध, चित्रकला, व्हिडिओ यांसारख्या रचनात्मक प्रकल्पांद्वारे शूरवीरांच्या शौर्यावर आधारित कामे करण्यास प्रोत्साहित केलं जातं.





