बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज आक्रमक झाला आहे. यामध्ये आता जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, समाजाने मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जालना शहरात भव्य अशा स्वरूपाचा मोर्चा काढला. जालना येथे बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं, या मागणीसाठी महामोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आता माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंना बंजारा समाजाच्या या मागणीला समर्थन दर्शविले आहे.
“बंजारा समाजाल ST आरक्षण द्या” -मुंडे
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नसल्याची घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलीयं. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून करुन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं. हा बंजारा समाज तेलंगणात, राजस्थानात आणि देशभरात अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या बाबतीत विचार करेल, तसा प्रयत्न मी करणार. हा माझा वैयक्तिक लढा असल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलंय. राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू केलंय. या गॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी भूमिका मुंडे यांनी घेतलीयं. बीडमध्ये बंजारा समाजाने आयोजित केलेल्या मोर्चानंतर ते बोलत होते.
हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे. त्यानुसार आता आधीचे एसटी आणि नव्याने येऊ घातलेले एसटी यांचा मेळ घालावा, त्याचा अभ्यास करावा. त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
जालन्यात बंजारा समाजाचा महामोर्चा
जालना येथे बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.






