धारावी सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतिक ठरणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Written by:Astha Sutar
Published:
धारावीतील १०८.९९ हेक्टर जमिनीचा विकास यात करणार असून, स्मार्ट आणि चालण्यायोग्य शहराची संकल्पना डोळ्यासमोर ठेवली आहे. मल्टी-मोडल ट्रान्सिट हब तसेच मेट्रो लाईन ११ ची थेट जोडणी करण्यात येणार आहे.
धारावी सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतिक ठरणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Eknath Shinde : मुंबईतील धारावी पुनर्विकासावरुन मोठं राजकारण गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र धारावी पुनर्विकासाकरिता राज्य सरकार पुढे सरसावले आहे. मुंबईत आगामी काळात धारावी हे सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येईल. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख पुसून टाकून सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे धारावी प्रतिक ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

धारावीकरांच्या जीवनशैलीत महत्वाचा बदल

दरम्यान, धारावी पुनर्विकासासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असून जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. राज्य सरकारच्या २०% हिस्सेदारीसह आणि अदानी समूहाच्या ८०% भागीदारीतला हा ₹९५,७९० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे केवळ निवासी वसाहत असणार नाही, तर धारावीकरांच्या जीवनशैलीत महत्वाचा बदल यामुळे घडणार आहे. धारावी पुनर्विकास आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

धारावीचा पुनर्विकास आमचं सामाजिक वचन…

दुसरीकडे धारावीचा पुनर्विकास फक्त पायाभूत सुविधांचा नाही, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक सलोख्याचं मॉडेल ठरेल. हे ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेनं उचललेलं ऐतिहासिक पाऊल आहे. तसेच धारावीचा पुनर्विकास म्हणजे आमचं स्वप्न नाही, तर आमचं सामाजिक वचन आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीकरांना केवळ हक्काचं घरच नाही, तर संपूर्ण नव्या जीवनशैलीत जगता येणार आहे. असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.