ठाण्यातून थेट दक्षिण मुंबईचा प्रवास शक्य होणार; 17.5 किमीच्या भुयारी मेट्रोला मान्यता

Written by:Rohit Shinde
Published:
ठाणेकरांसाठी गुड न्यूज आहे. आता थेट दक्षिण मुंबई गाठता येणार आहे. कारण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नवी भुयारी मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातून थेट दक्षिण मुंबईचा प्रवास शक्य होणार; 17.5 किमीच्या भुयारी मेट्रोला मान्यता

मुंबई लोकलनंतर मुंबईकरांच्या आणि आजूबाजूंच्या शहरांतील नागरिकांच्या जीवनात मेट्रोचे महत्व विशेष वाढते आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे ते मुंबई असा 17.5 किमीचा भुयारी मार्ग नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

ठाणे-दक्षिण मुंबई अंडरग्राऊंड मेट्रो

दक्षिण मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने महाराष्ट्र सरकारला एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे. मुंबई मेट्रो रेलने नवीन भूमिगत मेट्रो लाईन 11 मार्ग प्रस्तावित केल्याची माहिती समोर आली आहे. 17.5 किमी लांबीची हा मार्ग ठाण्यातील आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया असा असणार आहे. मुंबई मेट्रो रेलने सादर केलेल्या प्रकल्प अहवालानुसार, या लाईनमध्ये एकूण 13 स्थानके असतील, 12 स्थानके भूमिगत असतील.

भूमिगत मेट्रोचे नियोजन कसे ?

या भूमीगत मेट्रोमध्ये एकून 13 स्थानके असणार आहेत. वडाळा, शिवडी, वाडी बंदर, रे रोडहून पश्चिमेकडे भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, जीपीओ, हॉर्निमन सर्कल, गेट वे ऑफ इंडियाजवळ अपोलो बंदर अशी स्थानके असणार आहेत. समोर येणाऱ्या माहितीनुसार, आणिक-प्रतिक्षा नगर बेस्ट बस डेपो येथे 16 हेक्टर जमिनीवर मेट्रो डेपो प्रस्तावित आहे, जो मेट्रोला विद्यमान बस वाहतूक पायाभूत सुविधांशी जोडेल. प्रस्तावित 13 भूमिगत स्थानकांपैकी 8 स्थानके कट अँड कव्हर पद्धतीने बांधली जातील, तर उर्वरित 5 स्थानके न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने बांधली जातील.

ही मेट्रो लाईन दक्षिण मुंबईतील नागपाडा आणि भेंडी बाजार सारख्या सर्वाधिक गर्दीच्या आणि दाट लोकवस्तीच्या भागातून जाईल. ही नवीन लाईन मेट्रो 4 (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासरवडवली), अॅक्वा लाईन (लाईन 3-कफ परेड-बीकेसी-आरे जेव्हीएलआर), मोनोरेल आणि भायखळा आणि सीएसएमटी सारख्या उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडली जाईल. प्रवाशांना या नव्या मेट्रोचा विशेष फायदा होणार आहे.