मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना झालेल्या या अचानक भेटीमुळं राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात 50 मिनिटांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. या भेटीनंतर शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय घडलं हे सांगतिलं.
हे ही वाचा
टाऊन प्लॅनिंगच्या सूचनांबाबत भेट- राज ठाकरे
ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. 21 पैकी एकाही जागेवर या पॅनेलला यश मिळू शकलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून या निकालाकडे पाहण्यात येत होतं. हा निकाल बुधवारी लागला आणि गुरुवारी सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर सामान्य माणसांच्या खड्डे, वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांसाठी ही भेट झाल्याचं राज यांनी सांगितलंय.
माणसं महत्त्वाची की कबुतरं- राज ठाकरे
राज्यात असलेली वाहतूक कोंडी फोंडा, खड्ड्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या, बुडणारी शहरं वाचवा, परप्रातियांचे लोंढे थांबवा, असं आवाहन या भेटीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. पत्रकार परिषदेत अर्बन नक्षल यांना शिस्त लावण्यापेक्षा राज्यात शिस्त लावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त केली. राज्यात कबुतरं महत्त्वाची आहेत की माणसं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
जैन कबुतरांवर बसून उडून जातात का?-राज
घरात चार उंदिर झाले तर आपण काय करता, गणपतीचं वाहन आहे म्हणून घरात ठेवता का, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. कबुतरांचा पुळका आलेला जैन समाज कबुतरांवर बसून उडून जातो का, असंही राज ठाकरेंनी विचारलंय. खड्डे, रस्ते, गर्दी, वाहतूक कोंडी हे विषय महत्त्वाचे आहेत की कबुतरं असा सवाल राज यांनी केलाय. कबुतरं या विषयाचं राजकारण करायचं होतं, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचंही राज म्हणालेत.
संगनमतानं गैरप्रकार होत असल्याचा राज यांचा आरोप
रस्ते आणि खड्डे यावरही राज ठाकरेंनी कठोर वक्तव्य केलंय. हे सगळं साटलोटं असल्याचा आरोपही त्यांनी केला. रस्ते खराब झालेच पाहिजेत, त्यातूनच टेंडर निघतात, राजकारणी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतानं असे गैरप्रकार सुरु असल्याचा आरोपही राज यांनी केलाय.