Marathi News

फार्मा कंपनीच्या मेडीकल वेस्टमधून अंमली पदार्थांची तस्करी; छत्रपती संभाजीनगरमधून परराज्यात चालायचा ‘काळा-धंदा’

Written by:Rohit Shinde
Published:
मेडिकल वेस्ट गोदामात आणून त्यातून एमडी पावडर वेगळी करायचा व तिची तस्करी करायचा. ही पावडर गुजरातसह इतर राज्यांतील ड्रग्स तस्करांना पुरवली जात होती.
फार्मा कंपनीच्या मेडीकल वेस्टमधून अंमली पदार्थांची तस्करी; छत्रपती संभाजीनगरमधून परराज्यात चालायचा ‘काळा-धंदा’

छत्रपती संभाजीनगरमधून ड्रग्ज तस्करीसंदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाळूज एमआयडीसीमधील एका औषधनिर्मिती करणाऱ्या फार्मा कंपनीच्या मेडिकल वेस्टमधून तयार करण्यात आलेली एमडी (मेथेड्रोन) पावडर परराज्यात तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एनडीपीएस पथकाने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून, त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

कसा चालायचा काळा धंदा?

प्रकरणातील आरोपी बबन खान याच्याकडे २०११ पासून मायलान फार्मा कंपनीचे भंगार उचलण्याचे कंत्राट होते. सदर कंपनी एड्स, कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांवरील औषधे तयार करते. कंपनीचे औषधी उत्पादनातील काही रसायने टाकाऊ स्वरूपात मेडिकल वेस्टमध्ये जातात. बबन खान हा हा वेस्ट गोदामात आणून त्यातून एमडी पावडर वेगळी करायचा व तिची तस्करी करायचा. ही पावडर गुजरातसह इतर राज्यांतील ड्रग्स तस्करांना पुरवली जात होती. त्याने काही व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

१ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

एनडीपीएसच्या पथकाने २१ ते २३ जून या दरम्यान साजापूर चौफुली परिसरातील गोदामात छापा टाकून २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर आणि दोन टेम्पो असा एकूण १ कोटी ४३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना वाळूज पोलिस ठाण्यात विशेष वागणूक (व्हीआयपी ट्रीटमेंट) देण्यात आली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. अधिक तपास सुरू आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews