एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, भास्कर जाधवांच्या आवाहनानंतर ठाकरे सेनेत दुफळी

Written by:Smita Gangurde
Published:
भास्कर जाधव यांनी केलेल्या आवाहनानं महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता समीकरणाचा एक नवा पर्याय समोर आलाय. मात्र दोन्ही पक्षांनी हा पर्याय फेटाळल्याचं दिसतंय.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, भास्कर जाधवांच्या आवाहनानंतर ठाकरे सेनेत दुफळी

मुंबई – शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर मुंबईत होण्यासाठी, शिंदे शिवसेनेनं ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा, असं आवाहन भास्कर जाधवांनी केलंय. या विधानानंतर राजकीय वादंग रंगलंय. ठाकरेंच्या शिवसेनेलाही भास्कर जाधवांचा हा प्रस्ताव पसंत पडलेला नाहीये.

काय म्हणाले भास्कर जाधव?

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना हे असं भावनिक आवाहन केलंय. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकण्यासाठी शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असं जाधव म्हणालेत.भास्कर जाधवांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटले. खुद्द ठाकरे शिवसेनेतली दुफळीही यानिमित्तानं समोर आली.

संजय राऊतांनी जाधवांना फटकारले

शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची वाईट वेळ आलेली नाही, असं सांगत संजय राऊतांनी जाधवांनाच फटकारलंय. उद्धव ठाकरे कधीही गद्दार असलेल्या एकनाथ शिंदेंची मदत घेणार नाहीत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय.

शिंदे शिवसेनेचंही प्रत्युत्तर

शिंदेंच्या शिवसेनेनंही भास्कर जाधवांच्या या आवाहनाला प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंच्या शिवसेनेनीच शिंदेंना पाठिंबा द्यावा, असं दादा भुसे म्हणालेत. तर बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांविरोधात २०२२ साली सरकार स्थापन केल्याचं खुद्द एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी दिनी याचं राजकारण करणं योग्य नाही असं सांगत भाजपानंही भास्कर जाधवांना सुनावलंय.

नव्या समीकरणांची नांदी?

भास्कर जाधव यांनी केलेल्या आवाहनानं महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता समीकरणाचा एक नवा पर्याय समोर आलाय. मात्र दोन्ही पक्षांनी हा पर्याय फेटाळल्याचं दिसतंय. एकीकडे ठाकरे बंधू, पवार काका पुतणे एकत्र येत असल्याचं दिसत असताना, शिवसेनेतल्या बंडावरुन सुरु झालेला ठाकरे-शिंदे संघर्ष मात्र थांबणार नाही, हेच तूर्त तरी या सगळ्या प्रतिक्रियांतून दिसतंय.

Follow Us :GoogleNews