QR कोड स्कॅन करून तात्काळ तिकिट काढण्याची सुविधा बंद; वाढलेले गैरप्रकार टाळण्यासाठी रेल्वेचा महत्वाचा निर्णय

Written by:Rohit Shinde
Published:
मध्य रेल्वेने स्टेशनवरील QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
QR कोड स्कॅन करून तात्काळ तिकिट काढण्याची सुविधा बंद; वाढलेले गैरप्रकार टाळण्यासाठी रेल्वेचा महत्वाचा निर्णय

मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांकडून केला जाणार विना तिकिट प्रवास ही खरंतर बऱ्याच काळापासून एक गंभीर अशा स्वरूपाची समस्या खरंतर राहिलेली आहे.  मध्य रेल्वेने स्टेशनवरील QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून 4 सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवरकिंवा एटीव्हीएम मशीनवर रांगेत उभे राहावे लागेल. मात्र, युटीएस ॲप  वापरून प्रवाशांना स्टेशनबाहेरून तिकीट काढण्याची सुविधा सुरूच राहणार आहे.

विना तिकीट प्रवासाला आळा घालण्याचा प्रयत्न

रेल्वे प्रशासनाने 2016 मध्ये प्रवाशांना तिकीट रांगेतून सुटका मिळावी, या उद्येशाने युटीएस ॲप सुरू केले होते. या ॲपद्वारे स्थानकात लावलेले QR कोड स्कॅन करून तिकीट काढता येत होते. सुरुवातीला ही सेवा सोयीची वाटली, पण कालांतराने याचा गैरवापर वाढू लागल्याचे प्रशासनाला आढळून आलं. अनेक प्रवासी रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस दिसल्यावरच तात्काळ QR कोड स्कॅन करून तिकीट काढू लागले. यामुळे रेल्वेला आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे तुर्तास तरी रेल्वेकडून ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

रेल्वेचा पर्यायी व्यवस्थेवर विचार सुरू

सध्या तरी QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सेवा बंद असली तरी, रेल्वे प्रशासन यावर एक नवीन तोडगा काढण्याच्या विचारात आहे. रेल्वे स्थानकांवर डिजिटल स्क्रीन लावून त्यावर दर काही सेकंदांनी बदलणारे Dynamic QR कोड कार्यान्वित करण्याचा विचार सुरू आहे. ही नवी व्यवस्था सुरू होईपर्यंत प्रवाशांना तिकीट खिडकी, एटीव्हीएम किंवा जेटीबीएसच्या माध्यमातून तिकीट घ्यावे लागणार आहे. ही डायनॅमिक क्यूआर कोड व्यवस्था लागू झाल्यावर प्रवाशांना पुन्हा एकदा सोयीस्करपणे तिकीट काढणे शक्य होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

वळ एका विशिष्ट स्थानकावरच नव्हे, तर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांचे QR कोड इंटरनेटवर आणि अनेक वेबसाइट्सवर उपलब्ध होते. यामुळे प्रवाशांना कुठेही, कधीही तिकीट काढणे सोपे झाले होते, पण रेल्वेसाठी हा प्रकार नुकसानीचा ठरत होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने जुलै महिन्यात रेल्वे मंडळाकडे QR कोड तिकीट सेवा बंद करण्याची शिफारस केली होती, त्याला आता मंजुरी मिळाली आहे. मध्य रेल्वेने हा निर्णय घेण्यापूर्वीच पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व स्थानकांवरील QR कोड स्कॅन तिकीट सेवा बंद केली होती. आता दोन्ही प्रमुख रेल्वे मार्गांवर ही सुविधा बंद झाल्यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच तिकीट घेणे अनिवार्य झाले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews