Aditya Thackeray – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून निशाणा साधला होता. तर यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची नक्कल देखील केली. ‘यांचं पद गेलं पण मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही. असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. यानंतर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात खड्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असताना, आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.
फेकनाथ मिंधे ह्यांच्या भ्रष्ट कारभाराने…
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. “फेकनाथ मिंधे ह्यांच्या भ्रष्ट कारभाराने आज मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही! वाकोला पुलावरील खड्डे, ह्या बाबत आमचे आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी विडियो सोशल मिडियावर शेअर केला होता. २ वर्ष मी सातत्याने सांगतोय की ५ कंत्राटदारांना हाताशी घेऊन मिंधेनी स्वतःचे खिसे भरले, पण अजून खड्डे करुन ठेवले! आणि आज मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी महापालिका आयुक्तांना फोन केल्याची बातमी आहे.” असं पोस्टमध्ये ठाकरेंनी म्हटलं आहे.
भ्रष्ट कारभाराला भाजपाने पाठिंबा दिला…
पुढे पोस्टमध्ये ठाकरेंनी म्हटलंय की, “एकच गम्मत… ह्या भ्रष्ट कारभाराला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा गेली दोन वर्ष होता. मिंधेना वॉशिंग मशीन मधे त्यांनीच धुतलं… आणि मिंधेंनी मुंबईची तिजोरी धुतली!” असं पोस्टमध्ये आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले होते. त्यांनी शिंदेंना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश, निर्लज्ज व्यक्ती अशा विविध उपमा देत आपल्या मनातील संताप व्यक्त केला. यानंतर शिंदे आणि ठाकरेंमध्ये वाकयुद्ध रंगल्याचे दिसत आहे.





