फाल्कन 2000 जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणार्‍या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अगग्रण्य कंपनी असून, आतापर्यंत त्यांनी 10 हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे 90 देशांना त्याचा पुरवठा केला जातो. यामुळं रोजगारनिर्मिती होणार आहे.
फाल्कन 2000 जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

CM Devendra Fadnavis – राज्यातील तरुणांच्या रोजगारांबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. तसेच थेट फ्रान्समधून महाराष्ट्रात गुंतवणूक केली जाणार आहे. पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन 2000 जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला आहे. फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची प्रथमच ही निर्मिती होणार आहे. ही निर्मिती नागपुरात होणार  आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, त्यांनी कराराचे स्वागत केले आहे.

हजारो तरुणांच्या हाताला काम…

दरम्यान, भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन 2000 ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. फाल्कन 8 एक्स आणि 6 एक्स ची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन 2028 पर्यंत नागपुरात तयार होईल. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. 2017 मध्ये या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) ची स्थापना करण्यात आली होती. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे.

हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालना…

दुसरीकडे नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे. तसेच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठा चालना मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा बुस्ट मिळेल. असं बोललं जात आहे.