शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र “साहेब, आम्हाला अनुदानाची रक्कम कधी मिळणार?” असा साधा प्रश्न विचारल्यावर एका कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सचिन कांबळे असे या उद्धट कृषी अधिकाऱ्याचे नाव असून मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव ऋषिकेश पवार आहे. भर शेतातच हा प्रकार घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा (MGNREGA) योजनेअंतर्गत फळबाग लागवड केली होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या कामाची मजुरी मिळालेली नव्हती. वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्याने पवार यांनी कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्याकडे याबाबत जाब विचारला. जिल्हा पातळीवर तक्रार दाखल झाल्याने तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर दबाव निर्माण झाला होता.
यानंतर सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी आले असता, पवार यांनी थकित अनुदानाबाबत पुन्हा विचारणा केली. यावेळी ऋषिकेश पवार हे मोबाईलद्वारे संपूर्ण पाहणी आणि संवादाचे चित्रीकरण करत होते. हे लक्षात येताच कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचा संताप अनावर झाला.
शिवीगाळ आणि मारहाण
“व्हिडीओ का काढतोस?” असा जाब विचारत त्यांनी थेट शेतकऱ्यावर हात उचलला. इतकेच नव्हे तर अंगावर धावून जात बूट उगारला, शिवीगाळ केली आणि जमिनीवरील मातीची ढेकळे उचलून शेतकऱ्यावर फेकली. हा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून संबंधित कृषी अधिकाऱ्याची दादागिरी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शेतकरी वर्गात तीव्र संतापाची भावना असून संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.






