Marathi News

मराठवाडा, विदर्भात तुरळक पाऊस; पेरणी खोळंबल्याने बळीराजा चिंतातूर!

Written by:Rohit Shinde
Last Updated:
एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळत असताना मराठवाडा आणि विदर्भात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गात काहीसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
मराठवाडा, विदर्भात तुरळक पाऊस; पेरणी खोळंबल्याने बळीराजा चिंतातूर!

राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागात या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, अशातच काही भागात अद्यापही पावसानं हजेरी लावलेली दिसत नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडेच आहेत. परभणी जिल्ह्यात मे महिन्यात तब्बल 131 मिलिमीटर पाऊस झाला यानंतर जून महिन्यात शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता असताना मात्र यंदा मृग नक्षत्र ही कोरडेच गेले.

मराठवाडा, विदर्भात चांगल्या पावसाची प्रतीक्षा

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसऱ्या बाजुला मराठवाड्यात अनेक जिल्हे कोरडेच आहेत. परभणीत पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात फक्त 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कधी पाऊस पडणार? असा सवाल उपस्थित केला जातोय.   जूनची 19 तारीख उजाडली तरी केवळ 41 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. ज्या भागात पाऊस झाला तिकडे जवळपास 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

मराठवाड्यातील जालना, हिंगोली तसेच विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, अकोला या भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस नाही. शिवाय मान्सूनचा पाऊस देखील त्या पट्ट्यात अद्याप पूर्ण क्षमतेने सक्रिय झालेला नाही. अशा परिस्थितीत शेतकरी शेतीची कामे, पेरणी अद्याप करू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे.

राज्यातील पावसाची सद्यस्थिती काय?

गुरुवारी 19 जून रोजी राज्यात 4 जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. यात रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागाचा समावेश आहे. या भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानूसार मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. या भागात मान्सून सक्रिय होण्यास आणखी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो असं सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात काहीशी निराशा पाहायला मिळत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews