जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात आता मोठा घडामोड समोर येत आहे. खरंतर शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक अनुदान योजना राबवल्या जातात. मात्र, त्या मिळवताना दलाल, बनावट कागदपत्रे, गैरव्यवहार यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. खरी लाभार्थी न होता काहीजण पैसे खातात. तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे शेतकरी वंचित राहतात. त्यामुळे पारदर्शकता व कडक नियंत्रण गरजेचे आहे. जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या प्रकरणात आता थेट महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
महसूल विभागाचे अधिकारी अडचणीत
राज्यात चर्चिल्या गेलेल्या जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बातमी फार महत्वाची आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा अंबड पोलिसां गुन्हा दाखल झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एकूण 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
घोटाळा नेमका कसा झाला?
सन 2022-23 या काळात जालन्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. या नुकसानीचे पंचनामे करून त्यांची भरपाई म्हणून सरकारने अनुदान दिले होते. या सरकारी मदतीतून थोडा का होईना दिलासा मिळणार होता. मात्र याच अनुदानावर डल्ला मारण्यात आला. विशेष म्हणजे, यात महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनिअर सहभागी होते.परंतु, या अनुदानाचे वाटप करताना अनेक गैरप्रकार झाले होते. शेती नसलेल्या व्यक्तीच्या नावावर अनुदान टाकून तब्बल 72 कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आली होती.
अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 42 कोटी 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.एकाच शेतकऱ्याला दुबार अनुदान वाटप, शेतकरी नाही तरीही परगावातील आणि परजिल्ह्यातील लोकांच्या खात्यात अनुदान वळवण्यात आले होते. सातबारावरील नोंदीपेक्षा जास्त क्षेत्रवाढ दाखवणे, शासकीय जमिनी दाखवून अनुदानाचा लाभ देणे, जिरायत ऐवजी बागायत शेती दाखवणे, संबंधित खात्यात जमा झालेली रक्कम परत घेणे अशा विविध पद्धतीने फसवणूक झाली होती. आता या प्रकरणात पुढील काळात अनेक मोठे उलगडे होणार आहेत.






