पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 35 मिनिटं फोनवर चर्चा, मध्यस्थता स्वीकारणार नाही, केलं स्पष्ट

Written by:Smita Gangurde
Published:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी समजून घेतली आणि दहशतवादविरोधी भारताच्या लढाईला पाठिंबा दिल्याची माहितीही परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिलीय.
पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 35 मिनिटं फोनवर चर्चा, मध्यस्थता स्वीकारणार नाही, केलं स्पष्ट

नवी दिल्ली – जी सेव्हन समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यात 35 मिनिटं फोनवर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी आज दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच सविस्तर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

या चर्चेत दहशतवाद, ऑपरेशन सिंदूर, काश्मीर, पाकिस्तान, इराण-इस्रायल युद्ध अशा महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आपआपल्या देशात येण्याचं निमंत्रण दिल्याचंगी सांगण्यात येतंय.

भारत पाकिस्तान संबंधांवर चर्चा

मोदी आणि ट्रम्प यांच्या संभाषणात भारत आणि पाकिस्तान संबंधांबाबत चर्चा झाली. ऑपरेशन सिंदूर आणि व्यापाराचा कोणताही संबंद नाही, हे मोदींनी या चर्चेत स्पष्ट केल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलंय. भारत-पाकिस्तान आणि काश्मीर प्रश्नी कुणाचीही मध्यस्थता यापूर्वीही भारतानं नाकारलेली आहे आणि यापुढेही भारताची हीच भूमिका राहील, हेही मोदींनी स्पष्ट केल्याचं सांगण्यात येतंय. भारत आणि पाकिस्तानात झालेली शस्त्रसंधी पाकिस्तान गुडघ्यावर आल्यामुळं झाल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. दहशतवाद संपत नाही तोपर्यंत भारताकडून ऑपरेशन सिंदूर सुरुच राहील याचीही कल्पना मोदी यांनी ट्रम्प यांना दिल्याचं सांगण्यात आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी समजून घेतली आणि दहशतवादविरोधी भारताच्या लढाईला पाठिंबा दिल्याची माहितीही परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिलीय.

मोदी आणि ट्रम्प यांची भेट टळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जी 7 बैठकीत चर्चा होणार असल्याचं आधी ठरलं होतं. मात्र इस्रायल-इराण संघर्षामुळे ट्रम्प यांनी 17 जून रोजीच बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. भेट टळल्यामुळे यादोन्ही नेत्यांची एकमेकांशी फोनवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

लवकच दोन्ही नेते एकमेकांना भेटणार

कॅनडाच्या दौऱ्यानंतर अमेरिका भेटीचं निमंत्रण पंतप्रधान मोदींना ट्रम्प यांनी दिलं होतं. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे हे शक्य नसल्याचं मोदींकडून सांगण्यात आलंय. येत्या काळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आपआपल्या राष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं असून लवकरच दोन्ही नेते एकमेकांना भेटतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

Follow Us :GoogleNews