MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

रस्ते खोदल्याबाबत गणेश मंडळाकडून दंडाच्या रकमेत  वाढ नको, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मनपा आयुक्त भूषण गगराणींना निर्देश

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळांना केले. त्यामुळं आता वाढीव रक्कम मंडळाकडून घेता येणार नाही.
रस्ते खोदल्याबाबत गणेश मंडळाकडून दंडाच्या रकमेत  वाढ नको, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मनपा आयुक्त भूषण गगराणींना निर्देश

BMC – गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळ तयारीला लागले आहेत. दरम्यान, गणेश मंडळ रस्त्यात खड्डे खोदतात यावर पालिकेनं दंड आकारला आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत.

जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क

दरम्यान, मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळांना केले. तसेच आता जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क आकारले जाईल. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. या निर्णयाचे स्वागत करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानले.

आता वाढीव रक्कम नाही…

गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने वाढीव दंड रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करु नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळं आता वाढीव रक्कम मंडळाकडून घेता येणार नाही.