सरकारकडून विविध महामंडळांद्वारे उद्योजक तयार करण्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं. मराठा समाजात उद्योजक तयार करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेलं आहे. या महामंडळाला सरकारकडून 300 कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अर्थकसंकल्पात 750 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भातील शासन निर्णय 15 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.
मराठा समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार!
निर्णयातील माहितीनुसार 300 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळं मराठा समाजात नवे उद्योजक निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून ज्या योजना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला गती देण्यासाठी चालवल्या जातात त्यासाठी 300 कोटी वर्ग करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 750 कोटी रुपये देण्यासंदर्भातील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 300 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. नियोजन विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
नरेंद्र अण्णासाहेब पाटलांनी मानले सरकारचे आभार
हा निधी वर्ग झाल्यानंतर नरेंद्र पाटलांनी सरकारचे विशेष आभार मानले. ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो,’ असं नरेंद्र पाटील म्हणाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला गेला, अशी टीका होऊ शकते, असं देखील नरेंद्र पाटील म्हणाले. राज्य सरकार सगळ्याच महामंडळांना निधी देतं, असं पाटील म्हणाले. अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी 20 टक्के, 30 टक्के, 40 टक्के, 50 टक्के अशा प्रकारे निधी दिला जातो. मिळालेला निधी खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाला दिल्यानंतर पुढील निधी मिळतो, असं नरेंद्र पाटील म्हणाले. या निर्णयामुळे मराठा समाजातील अनेक नवउद्योजकांना उभारी मिळणार आहे. शिवाय, बिनव्याजी अर्थपुरवठ्यामुळे सामान्य तरूण प्रगतीची नवी शिखरे गाठू शकतात.