गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती, असे विजयसिंह बांगर म्हटले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय, असे आव्हाड यांनी म्हटले होते. त्यानंतर हा दावा समोर आल्याने आता एकच खळबळ माजली आहे. नेमके काय प्रकरण घडले ते सविस्तर जाणून घेऊ…
गोट्या गित्तेचा पोलिसांकडून शोध सुरू
बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणात सध्या पोलिसांकडून गोट्या गित्तेचा शोध घेतला जात आहे. मात्र, तो फरार आहे. शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. गोट्याने 16 जानेवारीचा जुना व्हिडीओ पोस्ट केल्याचे समजते. परळी जवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे पटरीवरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने वाल्मिक कराड हा आपले दैवत असल्याचे म्हटले आहे.
‘आव्हाडांना संपविण्यासाठी गोट्या गित्तेची रेकी’
त्यानंतर, विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेत गोट्या गित्तेने मुंबईत रेकी केल्याचा दावा केला आहे. “मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, गोट्या गित्ते हा सायको किलर विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे. परळीतील बहुतांश हत्याकांडात त्याचा हात असून महादेव मुंडे यांच्या हत्याकांडात तो संशयित आहे. मात्र, परळी पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. बीड आणि परळी पोलिसांनी तात्काळ गोट्या गित्तेला अटक केली पाहिजे. कारण, व्हिडिओ व्हायरल करून लोकप्रतिनिधीना हा धमकावत आहे,” त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळत आहे.
गोट्या गित्ते धमकावतोय, आव्हाडांचा दावा
“गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती. त्यामुळे तांदळे आणि गित्ते सराईत गुन्हेगारावर बीड पोलिसांनी कारवाई करावी,” अशी मागणी बांगर यांच्याकडून आज पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. दरम्यान, “गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय. वाल्मिक कराडचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू आंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. इन्स्पेक्टर महाजन याने गित्तेलाही वाचवण्याचे काम केले आहे. गित्ते हा नामचीन गुंड आहे, मी त्याला घाबरणार मी नाही. ” असा दावा जितेंद्र आव्हाडांनी या आधीच केला आहे.





