Marathi News

मुंबई पोलिसांसाठी सरकार बांधणार 55 हजार घरे; पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईतील ७५ भूखंडांचा वापर करून अंमलदार ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसाठी घरे बांधण्यात येणार असून, तब्बल 55 हजार घरे बांधली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई पोलिसांसाठी सरकार बांधणार 55 हजार घरे; पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा

मुंबई पोलिसांचे महत्व अत्यंत मोठे आहे कारण ते देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात. विविध धर्म, संस्कृती आणि भाषांचा संगम असलेल्या या महानगरात कायदा व सुव्यवस्था राखणे ही अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी आहे. दहशतवाद, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था, तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस नेहमी सज्ज असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत राहणारे हे पोलीस दल प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडते. अशा या पोलिसांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या गृह आणि गृहनिर्माण विभागाने आता मोठा निर्णय घेतला आहे.

पोलिसांसाठी 55 हजार घरे बांधणार

मुंबईतील ७५ भूखंडांचा वापर करून अंमलदार ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसाठी घरे बांधण्यात येणार असून, त्यासाठी पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ४५० ते ६०० चौरस फुटांची घरे सोयीसुविधांसह बांधण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. कामाच्या प्रदीर्घ वेळा आणि त्यानंतर घरी पोहोचण्यासाठी रोज करावा लागणारा दोन-तीन तासांचा प्रवास, यामुळे मुंबई पोलिस जेरीला येतात. मुंबईतील पोलिस ठाण्यांत कर्तव्यावर असलेल्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांना मुंबई शहरातच सरकारी घरे मिळावी, यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये तब्बल 55 हजार घरे बांधली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारच्या निर्णयाने पोलिसांना दिलासा

५१ हजार ३०८ इतके पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सदैव मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असतात. पोलिसांवरील ताण कमी व्हावा, यासाठी त्यांच्या कर्तव्याचे तास आठवर आणावेत, अशी मागणी केली जात होती. पोलिस ठाण्यात १० ते १२ तास काम केल्यानंतर मुंबई शहराच्या बाहेर कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, विरार आदी भागांत राहणाऱ्या पोलिसांना घरी पोहोचण्यासाठी दोन ते तीन तास लागतात.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्ती असल्यास पोलिसांना घरी जाणेच शक्य होत नाही. यामुळे मुंबई शहरातच पोलिसांना घरे मिळावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. यावर अखेर सरकारच्या गृहविभागाने शुक्रवारी निर्णय घेतला.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सायबर गुन्हे तपास आणि महिला सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न यामुळे मुंबई पोलिसांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या सेवेमुळे मुंबई सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहते. अशा या कर्तव्यदक्ष मुंबई पोलिसांसाठी सरकारने खऱ्या अर्थाने एक मोठा आणि दुरगामी परिणाम करणारा अशा स्वरूपाचा निर्णय या निमित्ताने घेतला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews