5 तारखेला विजयी सभा, काय म्हणाले उद्धव ठाकरे? राज उद्या भूमिका मांडणार, ठाकरे ब्रँड एकत्र येणार?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
हा जर मोर्चा निघाला असता तो अतिशय विशाल आणि मोठा झाला असता. हे सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळे मराठी माणसांच्या एकोपामुळे... मराठी मनाच्या एकोप्यामुळे त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला.
5 तारखेला विजयी सभा, काय म्हणाले उद्धव ठाकरे? राज उद्या भूमिका मांडणार, ठाकरे ब्रँड एकत्र येणार?

Uddhav Thackeray – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यानंतर शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोष करताहेत. तर यानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येताहेत. मराठी माणसाचा आणि मराठी मनाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. या निर्णयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

हा एकोपा असाच राहिला पाहिजे…

दरम्यान, पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने आता दोन जीआर रद्द केले आहेत आणि निर्णय मागे घेतलेला आहे. पण मराठी माणसांच्या आणि मराठी मनाचा एकोपामुळे आणि मराठी माणसाच्या रेट्यामुळे सरकारला झुकावं लागलं आहे. पण आता मराठी माणसांचा हा एकोपा असाच कायम राहिला पाहिजे. कोणतेही मराठी माणसावर किंवा भाषेवर संकट येण्याची वेळ कशाला बघायची. त्या आधीच मराठी माणसाने जागृत राहायला पाहिजे, असं आवाहन मराठी माणसांना उद्धव ठाकरेंनी केलं. तसेच मराठी माणसांनी एकत्र आलोय, ही एकजूट कायम राहू दे, असं ठाकरे म्हणाले.

जल्लोष किंवा सभा होईल…

हा निर्णय मागे घेतल्यामुळे आता मोर्चा काढायचे की नाही काढायचा, याबाबत आमची बोलणी सुरू आहेत. परंतु जरी मोर्चा नाही निघाला तरी जल्लोष किंवा सभा घेण्याचा आमचा विचार आहे. आधीचा जो अहवाल होता, तो मला वाटतंय मुख्यमंत्र्यांनी वाचला नसावा. किंवा मुख्यमंत्र्यांना मराठी वाचता येत नसेल. परंतु मराठी माणसाची भावना अतिशय तीव्र होती. आणि हा जर मोर्चा निघाला असता तो अतिशय विशाल आणि मोठा झाला असता. हे सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळे मराठी माणसांच्या एकोपामुळे… मराठी मनाच्या एकोप्यामुळे त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

थेट संवाद नसला तरी आमची बोलणी सुरु

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल येण्याआधीच यांनी आमचं सरकार पाडलं, तर तो अहवाल वाचणार कधी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आम्ही एकत्र येऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल मागे घेतलं आहे. मोर्चा झाला नाही तरी कार्यक्रम होईलच, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज आणि माझ्यात थेट संवाद नसला तरी आमची बोलणी सुरू आहेत. जरी मोर्चा होत नसला तरी एकत्रित कार्यक्रम व्हावा अशी माझी इच्छा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.