रक्त संकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण आणावे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

Written by:Astha Sutar
Published:
राज्यात रक्तपेढ्या स्थापन करणाऱ्या संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी नव्या नियमावली तयार करावे. तसेच नवी मुंबईतील खारघर येथील प्रशिक्षण केंद्र आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय सुरु करावे.
रक्त संकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण आणावे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

Health Minister Prakash Abitkar – आरोग्य मंत्रीपदाचा प्रकाश आबिटकर यांनी हाती धुरा घेतल्यापासून विभागातील कामांना गती दिली आहे. दरम्यान, आता राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये. यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने तयार करून सादर करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

रक्त वाया जावू नये यासाठी धोरण…

दरम्यान, उन्हाळ्यात व सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्ताचा तुटवडाही जाणवतो. तसेच स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, तसेच राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात. अशावेळी संकलित होणाऱ्या रक्ताला त्वरित मागणी नसल्यास रक्त वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी नवीन धोरण उपयोगाचे ठरेल, असा विश्वास मंत्री आबिटकर  यांनी व्यक्त केला.

NOC देण्यासाठी नव्या नियमावली…

राज्यात रक्तपेढ्या स्थापन करणाऱ्या संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी नव्या नियमावली तयार करावे. तसेच नवी मुंबईतील खारघर येथील प्रशिक्षण केंद्र आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये NAT टेस्टिंग (न्यूक्लिअरिक अॅसिड टेस्टिंग) सुरू करण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य भवन येथे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू रंगा नायक, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव बेंद्रे, डॉ. विजय कंदेवाड आदी उपस्थित होते.